अत्याचार करणाऱ्याला दहा वर्षाची शिक्षा; डोंगरखर्डा येथील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2020 05:32 PM2020-12-08T17:32:42+5:302020-12-08T17:32:56+5:30
प्रत्यक्षदर्शी व पीडितेची साक्ष
यवतमाळ : ट्यूशनवरून घरी जात असलेल्या अल्पवयीन मुलीला मेटीखेडा येथील ऑटो पाईंटवरून जबरदस्तीने दुचाकीवर बसवून नेले. नंतर तिच्यावर अत्याचार केला. या गुन्ह्यातील नराधमाला मंगळवारी जिल्हा सत्र न्यायालयाने दहा वर्ष कारावासाची शिक्षा ठोठावली.
गुणवंता रामभाऊ गेडाम रा.डोंगरखर्डा ता.कळंब असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. या नराधमाने ३ जून २०१७ रोजी अल्पवयीन मुलीला जबरदस्तीने दुचाकीवर बसवून नेले. रावेरी कॅनल पुलाखाली तिच्यावर अत्याचार केला. अश्लिल फोटो काढून तिला बदनामी करण्याची धमकी दिली. हा सर्व घटनाक्रम आरोपीचा मामेभाऊ नीलेश मडावी याने पाहिला.
राळेगाव पोलीस ठाण्यातील सहायक निरीक्षक ए.एन. सोळंके यांनी गुन्ह्याचा तपास करत दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले. या खटल्यात एकूण सात साक्षीदार तपासण्यात आले. अतिरिक्त सहायक जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.डब्ल्यू. चव्हाण यांनी पीडिता, प्रत्यक्षदर्शी नीलेश मडावी व डॉक्टरांची साक्ष ग्राह्य मानून आरोपीला दोषी ठरविले. बाललैंगिग शोषण कायद्यानुसार आरोपीला दहा वर्ष सक्तमजुरी व दहा हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. या खटल्यात जिल्हा सरकारी वकील नीती दवे यांनी सरकारी पक्षातर्फे युक्तिवाद केला.