आईसोबत अनैतिक संबंध ठेवणाऱ्या इसमाची चाकू भोसकून केली हत्या; दोन भावंडांवर गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2021 07:59 PM2021-05-10T19:59:08+5:302021-05-10T20:00:24+5:30
Murder Case : आरोपी कोमल रणगिरे याच्या वडीलाचा काही दिवसापूर्वी अपघाती मृत्यू झाला. त्याच्या नावाने असलेल्या विम्याच्या पाॅलीसीवर नॉमीनी म्हणून पळून गेलेल्या महिलेचे नाव होते.
गोंदिया : मागील तीन-चार वर्षापासून गावातील एका महिलेसोबत संबध ठेवून तिला नागपूरला पळवून नेले. परत गावात आणल्यावर तिच्या तरुण मुलांचा छळ करायचा यामुळे त्याचा खून त्याच्या प्रेयशीच्या मुलांनीच केल्याची घटना १० मे च्या दुपारी २.३० वाजता मूरपार येथील शेतातील झोपडीत घडली.
जयप्रकाश बसंतलाल लिल्हारे (४५) रा. मूरपार असे मृताचे नाव आहे. मृतक जयप्रकाश बसंतलाल लिल्हारे याचे मागील तीन-चार वर्षापासून गावातीलच एका महिलेसोबत अनैतिक संबंध होते. त्या संबंधापोटी त्याने तिला नागपूरला पळवून नेले. तिच्यासोबत त्याने नागपूरात दोन वर्ष काढले. मागील एक वर्षापासून तो मूरपार येथे परतल्यावर गावापासून शंभर ते दोनशे मीटर अंतरावर असलेल्या शेत शिवारात झोपडी करुन राहत होता. तर त्या महिलेचा पती व मुले आपल्या घरी राहात होते. परंतु मृतक जयप्रकाश लिल्हारे याने ज्या महिलेला पळवून नेले होते तिच्या मुलांना तुझ्या आईला मी पळविले परंतु तुम्ही काहीच करू शकले नाही म्हणून त्यांचा छळ करायचा. याचा वचपा म्हणून आरोपी कोमल रामचंद्र रणगिरे (३३) व रुपेश रामचंद्र रणगिरे (१९) दोन्ही रा. मुरपार या भावंडांनी चाकूने मारून त्याचा खून केला. या घटनेसंदर्भात रावणवाडी पोलिसांनी भादंवि कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलीस निरीक्षक उमेश पाटील करीत आहेत.
विम्याच्या ३.५० लाखाचाही होत वाद
आरोपी कोमल रणगिरे याच्या वडीलाचा काही दिवसापूर्वी अपघाती मृत्यू झाला. त्याच्या नावाने असलेल्या विम्याच्या पाॅलीसीवर नॉमीनी म्हणून पळून गेलेल्या महिलेचे नाव होते. पॉलीसी सुरूच असतांना नॉमीनीचे नाव बदलविले नव्हते. रमचंद्र रणगीरे यांच्या नावाने असलेल्या ३ लाख ५० हजार रूपये विम्याचे पैसे पळून गेलेल्या आपल्या आईला मिळू नये म्हणून आरोपी मुलांचा प्रयत्न होता. हा देखील वाद त्यांच्यात सुरु असल्याची माहिती आहे. या दिशेने देखील रावणवाडी पोलीस तपास करीत आहेत.