सरस्वतीला कीटकनाशक पाजले? सानेने हत्या करण्यापूर्वी केले हाेते खरेदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2023 08:51 AM2023-06-13T08:51:27+5:302023-06-13T08:51:40+5:30
पाेलिसांचा तपास सुरू, नर्सरीच्या दुकानात जाऊन कीटकनाशकाबद्दल केली होती चौकशी
लोकमत न्यूज नेटवर्क, मीरा रोड: सरस्वती वैद्य हिची हत्या करण्यापूर्वी क्रूरकर्मा मनाेज साने याने बाेरिवलीच्या एका दुकानातून कीटकनाशक खरेदी केल्याची माहिती तपासात उघड झाली आहे. सरस्वतीची हत्या करण्यासाठी मनोज सानेने हे कीटकनाशक खरेदी केल्याचा पाेलिसांना संशय असून, त्या दिशेने चाैकशी सुरू असल्याचे पाेलिस सूत्रांनी सांगितले.
मीरा राेड येथे बुधवारी उघड झालेल्या हत्याकांडाच्या तपासात नवनवीन खुलासे उघड हाेत आहेत. हत्येनंतर आराेपीने तिच्या मृतदेहाचे तुकडे केले हाेते. त्यातील ३० ते ३५ तुकडे घरात सापडले हाेते. त्याने काही तुकडे रेल्वेमार्गालगत असलेल्या नाल्यांत तसेच अन्यत्र टाकल्याचा पाेलिसांना संशय आहे. या पार्श्वभूमीवर पाेलिसांनी सानेला संबंधित घटनास्थळी नेले हाेते. सीसीटीव्ही फुटेजच्या पडताळणीत साने हा मृतदेहाचे तुकडे फेकण्यास बाहेर जात असल्याचे दिसून आले. अनेकदा तो तुकडे फेकण्यासाठी बाहेर गेला असण्याची शक्यता आहे. सरस्वतीने विष पिऊन आत्महत्या केल्याचे सानेने पोलिसांना सांगितले हाेते.
सोमवारी दुपारी पोलिसांनी त्याला बोरिवलीच्या बाभई येथील एका नर्सरीच्या दुकानात नेले हाेते. तेथे केलेल्या चाैकशीत साने यानेच कीटकनाशक खरेदी केल्याचे उघड झाले. त्यामुळे त्याने हत्या करण्यासाठी कीटकनाशके या दुकानातून खरेदी केली हाेती का, याची चाैकशी पाेलिस आता करत आहेत. पोलिस सूत्रांनीही त्यास दुजोरा दिला आहे. साने व सरस्वती यांच्या मोबाइलची आणि सीडीआरची पोलिस कसून पडताळणी करत आहेत. दरम्यान, गुन्ह्याचे गांभीर्य पाहून पोलिसांनी मीरा-भाईंदर महापालिकेकडे सरकारी पंच मागितले होते. पालिकेने त्यांचे कर्मचारी सरकारी पंच म्हणून दिले हाेते.
वज्रेश्वरी मंदिरात केले हाेते लग्न
सानेने सरस्वतीसाेबत लग्न झाल्याची बाब लपवली हाेती. दाेघांनी एका मंदिरात लग्न केल्याचे त्यांना सरस्वतीने सांगितल्याचे बहिणींनी पाेलिसांकडे उघड केले हाेते. आता त्यांनी २०१४ मध्ये वज्रेश्वरी देवीच्या मंदिरात लग्न केल्याचे समोर आले आहे.
रे राेड स्मशानभूमीत अंत्यसंस्कार
सरस्वती हिच्या मृतदेहाचे तुकडे सोमवारी दुपारी जेजे रुग्णालयातून तिच्या तीन बहिणींच्या स्वाधीन करण्यात आले. त्यानंतर सरस्वतीवर मुंबईतील रे रोड स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
बहिणींचे घेतले डीएनए नमुने
सरस्वतीच्या एका विवाहित बहिणीने १९९८ मध्ये आत्महत्या केली होती. त्यामुळे पाच बहिणी असल्याचे सांगितले जात असले तरी तीन बहिणीच समोर आल्या आहेत. साेमवारी सरस्वतीच्या तिन्ही बहिणींचे डीएनए नमुने तपासणीसाठी घेण्यात आले आहेत.