पेट्रोल पंप लुटून, देव्हाऱ्याजवळ जमिनीत पुरली रक्कम; पाच आरोपी गजाआड
By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2022 07:56 PM2022-02-10T19:56:47+5:302022-02-10T19:57:39+5:30
Dacoity on Petrol Pump : कर्मचाऱ्याचाही समावेश, १५ लाखाची रोकड हस्तगत
ठाणे : कापूरबावडी येथील ब्राॅडवे पेट्रोल पंपाची २७ लाख ५० हजार रुपयाची तिजोरी लुटणाऱ्या पाच आरोपींना कापूरबावडी पोलिसांनीअटक केली. त्यांच्याकडून १५ लाखाची रोकड हस्तगत केल्याची माहिती पोलिसांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली.
३१ जानेवारी रोजी मध्यरात्री २ वाजताच्या सुमारास पेट्रोल पंपाच्या ऑफिसमधून २७ लाख ५० हजाराची लोखंडी तिजोरी काही अज्ञात आरोपींनी उचलून नेली होती. आरोपींनी त्यांचे चेहरे मास्क आणि टोपी घालून झाकले होते. त्यामुळे आरोपींचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांपुढे होते. आरोपींच्या अटकेसाठी तीन पथके नेमण्यात आली होती. त्यांनी ३५ ठिकाणच्या सीसी कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले. पेट्रोल पंपाचे ऑफिस बनावट चावीने उघडल्याने आरोपींमध्ये पेट्रोल पंपाच्या एखाद्या कर्मचाऱ्याचा सहभाग असावा, असा संशय पोलिसांना आला. त्यामुळे पंपावरील कर्मचाऱ्यांची तसेच काही माजी कर्मचाऱ्यांचीही चाैकशी केली असता, नोकरी सोडून गेलेल्या नयन पवार हा गुन्हेगारीवृत्तीचा असल्याची माहिती मिळाली. याशिवाय फुटेजमधील आरोपींपैकी एकाची शरीरयष्टी नयन पवारशी मिळतीजुळती असल्याने पोलिसांचा संशय बळावला. त्यानुसार पोलिसांनी सांगली जिल्ह्यातील कडेगाव तालुक्यातील खेराडीवांगी येथील मूळ घरून नयनला अटक केली. गावाकडील ओळखीचे तीन साथीदार आणि पंपावरील एका कर्मचाऱ्याच्या मदतीने पंप लुटण्याचे नियोजन आखल्याची कबुली त्याने पोलिसांजवळ दिली. चाैकशीदरम्यान त्याने सुधाकर मोहिते, विनोद कदम आणि भास्कर सावंत यांच्यासह पंपावरील कर्मचारी रिलेश मांडवकर यांची नावे सांगितली. त्यानुसार पोलिसांनी आधी सातारा येथून विनोद कदम याला अटक केली. त्याने सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे देऊन पोलिसांशी वाद घातला; मात्र पोलिसी खाक्या दाखवताच त्याने गुन्ह्याची कबुली देऊन दोन साथीदारांच्या वास्तव्याची माहिती दिली. त्यानुसार भास्कर सावंत आणि सुधाकर मोहिते यांना सांगली येथून ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर पंपावरील कर्मचारी रिलेश मांडवकर याला पोलिसांनी ठाण्यातून अटक केल्याची माहिती पाेलीस उपायुक्त विनयकुमार राठोड, सहायक पोलीस उपायुक्त नीलेश सोनवणे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम सोनवणे आदींनी पत्रकार परिषदेत दिली.
चोरीच्या पैशातून फेडले कर्ज
पाचपैकी सुधाकर मोहिते, विनोद कदम आणि भास्कर सावंत हे तीन आरोपी सराईत असून, त्यांच्याविरुद्ध वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात यापूर्वीही काही गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली. आरोपींकडून १५ लाख ९०० रुपये हस्तगत केले असून, उर्वरित सुमारे १२.५० लाख रुपयातून त्यांनी कर्ज, उसनवाऱ्या चुकत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले.
देव्हाऱ्याजवळ पुरली होती रोकड
पेट्राेल पंप लुटल्यानंतर आरोपींनी काही रक्कम खर्च केली होती. उर्वरित १५ लाख रुपये सुरक्षित राहावेत, यासाठी विनोद कदम याच्या घरात देव्हाऱ्याजवळ जमिनीत ही रोकड पुरून ठेवण्यात आली होती. आरोपींकडून ही माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने सातारा येथे पथक पाठवून ही रक्कम हस्तगत केली. सर्व आरोपींना न्यायालयाने ११ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.