दोडामार्ग गोवा सीमेवरील पेट्रोल पंप अज्ञात चोरट्यांनी फोडला; १६ लाखांची रोकड लंपास, तालुक्यात खळबळ
By महेश चेमटे | Published: May 30, 2023 08:53 AM2023-05-30T08:53:51+5:302023-05-30T08:55:34+5:30
याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
महेश सरनाईक -
सिंधुदुर्ग : दोडामार्ग व गोवा राज्याच्या सीमेवरील भारत पेट्रोलियम कंपनीचा पेट्रोल पंप अज्ञात चोरट्यांनी रविवारी फोडला. ही घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली. यावेळी चोरट्यांनी १६ लाख रुपयांची रोकड लंपास केल्याची तक्रार पेट्रोलपंप मालकाने गोवा दोडामार्ग पोलिस दूरक्षेत्रात केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
दोडामार्ग - गोवा सीमेवर भारत पेट्रोलियम व हिंदुस्थान पेट्रोलियम या दोन्ही कंपन्यांचे पेट्रोलपंप आहेत. या दोन्ही पंपावर दरदिवशी लाखोंची उलाढाल होते. हे दोन्ही पंप सकाळी ६.३० ते रात्रौ १०.३० पर्यंत खुले असतात.त्यापैकी भारत पेट्रोलियम कंपनीचा पेट्रोलपंप रविवारी रात्री बंद करून कामगार घरी गेले. सोमवारी सकाळी ते पुन्हा पेट्रोलपंपवर आले असता त्यांना ऑफिसचे कॅबिन खुले दिसले. कोणी तरी अज्ञातांनी ते फोडल्याचे निदर्शनास येताच एकच खळबळ उडाली. लागलीच त्यांनी पंपमालक व गोवा पोलिसांना याबाबत कळविताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले.
यावेळी १६ लाखांची रोकड लंपास झाल्याची तक्रार पंपमालकाने केली असून त्यानुसार पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.या घटनेमुळे मात्र सिमावर्ती भागासह दोडामार्ग तालुक्यात खळबळ उडाली आहे.