प्लॅन २०४७! PFI कार्यकर्त्याकडून मिळालं पुस्तक; मिशन 'बयाथीस' चा अर्थ काय?
By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2022 02:56 PM2022-09-27T14:56:58+5:302022-09-27T14:58:00+5:30
अलीकडेच, महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने मुंबईतील पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या एका कार्यकर्त्याकडून 'प्लॅन २०४७' नावाचं एक पुस्तक जप्त केलं.
नवी दिल्ली - देशभरातील पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (PFI) विरुद्ध धडक कारवाई सुरू आहे. मंगळवारी २७ सप्टेंबर रोजी या संस्थेशी संबंधित २०० हून अधिक लोकांना देशातील वेगवेगळ्या राज्यांमधून ताब्यात घेण्यात आले. ३० हून अधिक लोकांना अटक करण्यात आली. गेल्या आठवड्यात शेकडो कार्यकर्त्यांना जेरबंद केले. पकडलेल्यांमध्ये पीएफआयचे अध्यक्ष ओमा सलामचे नाव समाविष्ट आहे. PFI ने सरकारविरूद्ध हिंसक कृत्य करण्याचा निर्णय घेतला आहे यासाठी मिशन 'बयाथीस' चा मार्ग निवडण्याची योजना आखली जात होती असं सूत्रांकडून समोर आले आहे.
प्लॅन २०४७ नावाचं पुस्तक हाती लागलं
अलीकडेच, महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने मुंबईतील पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या एका कार्यकर्त्याकडून 'प्लॅन २०४७' नावाचं एक पुस्तक जप्त केलं. हा छापा पीएफआय आणि त्याच्या राष्ट्रविरोधी कारवाईचा देशव्यापी कृतीचा एक भाग होता. पीएफआयचे अधिकारी, सदस्य आणि कार्यकर्ते मुस्लिम तरुणांना कट्टरपंथी बनविण्यात आणि भरती करण्यात सामील होते. या तरुणांना ISISसारख्या दहशतवादी संघटनांमध्ये सामील होण्यासाठी ढकलले जात होते असं पीएफआयविरूद्ध NIA च्या मेगा ऑपरेशनमध्ये दिसून आले.
NIA आणि ED नं पीएफआयच्या उच्च नेते आणि सदस्यांच्या घरे आणि कार्यालयांवर छापे टाकले, ज्यात संघटनेच्या सदस्यांनी दहशतवाद निधी, प्रशिक्षण शिबिरे आणि ते लोकांचे आयोजन केले होते याचे पुरावे सापडले आहेत. आरोपी धर्माच्या आधारे विविध गटांमध्ये शत्रुत्व वाढविण्याच्या उद्देशाने हिंसक आणि दहशतवादी कृत्ये करण्यासाठी प्रशिक्षण देण्यासाठी शिबिरे आयोजित करीत आहेत असा NIA नं दावा केला.
बयाथीस म्हणजे 'मौत का सौदागर'
जप्त केलेल्या चिठ्ठीत याचा खुलासा झाला की, PFI सरकारी संस्था, भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रीय स्वामसेवक नेते आणि संघटना यांना निशाणा बनवण्याचा प्लॅन आखत होती. माहितीनुसार, तिहार तुरूंगात ज्येष्ठ नेत्यांना ठेवल्यानंतर पीएफआय कार्यकर्ते संतापले आहेत. पीएफआयने सरकारविरूद्ध हिंसकपणे सूड उगवण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी पीएफआयने बयाथीसचा मार्ग निवडला आहे. बयाथीस हा एक अरबी शब्द आहे ज्याचा अर्थ हिंदीत मौत का सौदागर असा होता. ज्यात बदला घेण्यासाठी मरण्याचे किंवा मारण्याचा निश्चिय केला आहे.