'पीएफआय'च्या मौलाना इरफानच्या बांधल्या मुसक्या; जातीय वाद भडकविण्याचा होता डाव!
By अझहर शेख | Published: November 14, 2022 02:24 PM2022-11-14T14:24:08+5:302022-11-14T14:24:38+5:30
PFI : दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकून घेत जिल्हा सत्र न्यायाधीश ए.यु.कदम यांनी त्यास चौदा दिवसांची एटीएस कोठडी सुनावली.
नाशिक : दहशतवादी विरोधी पथकाने 'पीएफआय'च्या तपासात सातव्या संशयित आरोपीला मालेगावातून अटक केली आहे. इरफान दौलत खान नदवी उर्फ मौलाना इरफान खान (३५, रा.गुलशेरनगर, मालेगाव) असे संशयित आरोपीचे नाव आहे. नाशिक जिल्हा न्यायालयात सोमवारी (दि.१४) खान यास हजर करण्यात आले. दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकून घेत जिल्हा सत्र न्यायाधीश ए.यु.कदम यांनी त्यास चौदा दिवसांची एटीएस कोठडी सुनावली.
देशभरात एकाचवेळी सप्टेंबरमध्ये पहाटेच्या सुमारास राज्याच्या दहशतवादविरोधी पथक व एनआयएच्या माध्यमातून छापेमारी करत ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’च्या संशयित सदस्य व पदाधिकाऱ्यांची धरपकड करण्यात आली होती. नाशिक दहशतवादविरोधी पथकाने मालेगावातून आतापर्यंद दोघा मौलवींना अटक केली आहे. तसेच मागील महिन्यात २१तारखेला जळगावातून संशयित उनैस उमर खय्याम पटेल (३२) यास अटक करण्यात आली होती. त्यानंतर मालेगावातून रविवारी (दि.१३) मौलवी इरफान यास एटीएसच्या पथकाने अटक केली.
खान याने औरंगाबाद, बीड, जालना, नांदेड या शहरांमध्ये नुपुर शर्माच्या निषेधार्थ आंदोलनाची धार सोशलमिडियाच्या माध्यमातून तीव्र केली होती. यावेळी त्याने व्हाट्सएपच्या एका ग्रुपमधून मुस्लीम समाजात चिथावणीखोर वक्तव्य मॅसेजद्वारे करत सशस्त्र जातीय संघर्ष निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता, असा युक्तीवाद सरकार पक्षाकडून विशेष सरकारी वकील अजय मिसर यांनी न्यायालयात केला.
गुन्ह्याच्या पुढील तपासाकरिता १४ दिवसांची एटीएस कोठडीची मागणी मिसर यांनी केली. संशयिताच्या वतीने ॲड. खान यांनी बाजू मांडत न्यायालयीन कोठडीची मागणी केली. न्यायालयाने त्यांची मागणी फेटाळून लावत संशयिताला येत्या २८ तारखेपर्यंत एटीएस कोठडी सुनावली. या गुन्ह्याचा तपास दहशतवादविरोधी पथकाचे सहायक आयुक्त अरुण वायकर हे करीत आहे.
न्यायालयातील युक्तीवाद असा....
एटीएसकडून यापुर्वी पोलिसांनी अटक केलेल्या संशयितांसोबत खान याचा सातत्याने संपर्क. पुणे, मालेगाव, जळगावमधून यापुर्वी अटक केलेल्या सहा संशयितांसोबत ५०० वेळा तर उर्वरित पीएफआयच्या अन्य संशयितांसोबतसुद्धा त्याचा ६०० वेळा संवाद झाला आहे. त्यांच्यासोबतच्या संभाषण संवेदनशील व आक्षेपार्ह असून त्याच्या ध्वनिफितींची स्क्रीप्ट न्यायालयापुढे ठेवण्यात आल्या आहेत.
संशयित हा प्रतिबंधित ऑल इंडिया इमाम कौन्सिल संघटनेचा अध्यक्षदेखील आहे. मालेगावात २०१९सालापासून तो ‘पीएफआय’या प्रतिबंधित संघटनेसाठी समन्वयक म्हणून काम करत आहे. एका विशिष्ट समाजात तो व्हॉट्सॲप ग्रूपद्वारे असुरक्षिततेची भावना पसरवून समाजात सशस्त्र जातीय संघर्ष निर्माण करण्याचा प्रयत्न करत होता. त्याच्यावर यापुर्वीही मालेगावात स्थानिक पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
सहाशे वेळा संवाद अन् सांकेतिक ‘कोड’चा वापर
संशयित मौलाना इरफान याने यापुर्वी अटक केलेल्या पीएफआयच्या सहा संशयितांसोबत सातत्याने ‘संपर्क’ टिकवून ठेवत सुमारे ५०० ते ६००वेळा संवाद साधला आहे. त्याच्या आवाजाचे नमुने पोलिसांनी तपासणीसाठी घेतले आहे. हा संवाद आक्षेपार्ह असून यामध्ये काही सांकेतिक ‘कोड’चाही वापर केल्याचे तपासात समोर आले आहे. हे कोड नेमके काय आहे? दहशत पसरविण्यासाठी अर्थसहाय्य कोणी व कोठून करत होते? परदेशांमधील फोन कॉल्स? एका विशिष्ट समाजात असुरक्षिततेची भावना पसरविण्याचा कुटील डावमागील हेतू? अशा विविध बाबींचा सखोल तपास करावयाचा असल्याचे ॲड. अजय मिसर यांनी न्यायालयाला सांगितले. पोलिसांनी त्याचा मोबाइल जप्त केला आहे.