निवडणुकीच्या तोंडावर भाजपाच्या नगरसेवकांमध्येच तुफान हाणामारी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2019 08:41 PM2019-10-03T20:41:24+5:302019-10-03T20:53:33+5:30

नया नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

In the phase of the elections, Fighting between the BJP councilors | निवडणुकीच्या तोंडावर भाजपाच्या नगरसेवकांमध्येच तुफान हाणामारी

निवडणुकीच्या तोंडावर भाजपाच्या नगरसेवकांमध्येच तुफान हाणामारी

Next
ठळक मुद्दे भाजपाने पुन्हा आमदार नरेंद्र मेहता यांना उमेदवारी दिल्याने भाजपाच्या माजी महापौर गीता जैन या अपक्ष म्हणून निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहेत. दिनेश यांनी गिता सिंग या महिलेच्या डोळ्यावर ठोसा मारुन दुखापत केली व धमकावल्याचे वाघमारे यांच्या फिर्यादित म्हटले आहे.

मीरारोड - मीरारोडच्या शांत नगर सेक्टर ३ च्या मैदानातील नवरात्री उत्सवात भाजपाच्या माजी महापौर यांना मेहता समर्थक नगरसेवक दिनेश जैन यांनी अपमानास्पद वागणुक दिल्याच्या कारणावरुन मेहता समर्थक व जैन समर्थकांमध्ये धक्काबुक्की, शिवीगाळ झाली. या प्रकरणी भाजपा नगरसेवक - पदाधिकाऱ्यांनी पोलीस ठाण्यात ठाण मांडल्यानंतर दिनेश यांच्या पत्नी सुनिता यांच्या फिर्यादीवरुन जैन यांच्यासह २३ जणांवर गुन्हा दाखल केला. त्यानंतर गीता जैन समर्थक प्रमिला वाघमारे यांच्या फिर्यादीवरुन दिनेश जैन, सुनिता जैनसह १४ जणांवर विनयभंग व विविध कलमांअन्वये नया नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मीरा भाईंदर विधानसभा मतदार संघातुन भाजपाने पुन्हा आमदार नरेंद्र मेहता यांना उमेदवारी दिल्याने भाजपाच्या माजी महापौर गीता जैन या अपक्ष म्हणून निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहेत. उद्या शुक्रवारी त्या आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत. त्यामुळे शहरातील राजकिय वातावरण ढवळुन निघाले आहे. त्याची प्रचिती बुधवारी रात्री शांती नगर सेक्टर ३ मधील नवरात्री उत्सवात पहायला मिळाली.

सदर ठिकाणी भाजपा नगरसेवक दिनेश जैन हे नवरात्रीचे आयोजन करतात. पण त्याच सोबत आयोजन समिती मध्ये स्थानिक नागरीक देखील आहेत. बुधवारी रात्री महापौर डिंपल मेहता यांनी नवरात्रीला भेट दिली असता व्यासपीठावर दिनेश यांनी त्यांचे स्वागत करत त्यांना भाषण करायला दिले. डिंपल ह्या भाषण करत असतानाच आयोजन समिती मधील काही रहिवाशांच्या विनंती वरुन गीता जैन मैदानात आल्या. डिंपल निघुन गेल्यावर आयोजन समिती सदस्यांनी गीता यांना व्यासपीठावर नेले. तेथे सदस्यांनी गीता यांचा सत्कार करण्यास सांगीतले. असता दिनेश यांनी नकार दिला. त्यावरुन दिनेश व त्यांची पत्नी सुनिता सह त्यांचे समर्थक तर दुसरीकडे गीता यांच्या समर्थकां मध्ये धक्काबुक्की व शिवीगाळ झाली. यावरुन वातावरण चांगलेच तापले.

या घटने नंतर भाजपाचे नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते आदी मोठ्या संख्येने नया नगर पोलीस ठाण्यात जमले. त्यांनी गीता जैन आणि त्यांच्या समर्थकांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी लावुन धरली. अखेर पोलीसांनी दिनेश यांच्या पत्नी सुनिता(४२ ) रा. शांती नगर सेक्टर १, मीरारोड यांच्या फिर्यादीवरुन गीता जैन, नारायण नांबियार, डॉ. जितेंद्र जोशी, मिलन भट, राजेंद्र मोरे, धवल मकवाना, राजेश व अनोळखी १६ जणां विरोधात विनयभंग केल्यासह मारहाण , शिवीगाळ, धमकी आदी विविध कलमां खाली गुन्हा दाखल केला. गीता व त्यांचे समर्थक जबरदस्तीने स्टेजवर आले आणि गीता यांचे स्वागत करा म्हणुन आग्रह केला. त्यास मनाई केली असता गीता यांच्या सांगण्या वरुन सर्वांनी मारामारी सुरु केली. सुनिता व दिनेश यांना बाऊन्सर आणि महिलांनी मारहाण केली. चारित्र्याची बदनामी केली असे फिर्यादीत म्हटले आहे.

तर गीता यांच्या सोबत असलेल्या प्रमिला रोहिदास वाघमारे (४०) रा. रामदेव पार्क, मीरारोड यांनी देखील नगरसेवक दिनेश जैन व त्यांची पत्नी सुनिता सह अन्य १२ अनोळखी लोकां विरोधात दिलेल्या फिर्यादी नंतर पोलीसांनी विनयभंग, मारहाण, शिवीगाळ आदी कलमां खाली गुन्हा दाखल केला आहे. स्टेजवर दिनेश यांनी गीता यांचा मुद्दाम अपमान करत स्वागत केले नाही. त्यामुळे निमंत्रण देणाऱ्या सदस्यांना अपमानास्पद वाटले. प्रमिला यांनी पुढे सुत्रसंचालकास बोलावले असता त्याचा राग येऊन दिनेश जैन, सुनिता व अन्य १० ते १२ जणांनी शिवीगाळ करुन धक्का बुक्की - मारहाण, विनयभंग केला. दिनेश यांनी गिता सिंग या महिलेच्या डोळ्यावर ठोसा मारुन दुखापत केली व धमकावल्याचे वाघमारे यांच्या फिर्यादित म्हटले आहे. निवडणुकीच्या अनुषंगाने आ. नरेंद्र मेहता व गीता जैन यांच्यातील राजकिय संघर्ष आणखी पेटण्याची चिन्हे दिसत आहेत. तर सदर घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला असून एकूणच त्यातील घटनाक्रम पाहता सदर प्रकार निव्वळ अदखलपात्र स्वरुपाचा असताना देखील राजकिय हेतूने दखलपात्र स्वरुपाची फिर्याद देण्यात आल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.

Web Title: In the phase of the elections, Fighting between the BJP councilors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.