‘फोन पे’ची सेफ गोल्ड गुंतवणूक ठरली ‘फेक’; लिंक क्लिक करताच तरुणीचे ४ लाख गायब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2019 11:51 AM2019-12-13T11:51:48+5:302019-12-13T11:56:31+5:30
योजनेत गुंतवणूक केल्यास तेवढीच रक्कम कॅशबॅक (परत) मिळेल असे आमिष दाखविले.
औरंगाबाद : फोन पेवरून व्यवहार करणाऱ्या तरुणीला सेफ गोल्ड योजनेच्या नावाखाली ४ लाख रुपयांचा ऑनलाईन गंडा घातल्याचे समोर आले. या फसवणुकीसंदर्भात तरुणीने गुरुवारी सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दिली.
व्यंकटेशनगर येथील तरुणी ही शासकीय ज्ञान, विज्ञान आणि कला महाविद्यालयात शिक्षण घेते. तिचे भारतीय स्टेट बँकेत बचत खाते आहे. या खात्यांतर्गत तिने वेळोवेळी बचत करून ३ लाख ८४ हजार ९९९ रुपये मुदत ठेव ठेवली होती. तर दैनंदिन खर्चासाठी स्वतंत्र रक्कम ठेवली होती. तिने तिचे एटीएम कार्ड बँकेला मेसेज पाठवून ब्लॉक केले होते. तेव्हापासून तिने तिच्या मोबाईलवर फोन पे हे अॅप्लीकेशन डाऊनलोड करून त्यावरून ती व्यवहार करीत होती. ३० नोव्हेंबर रोजी तिला एका मोबाईलवरून फोन आला. फोन करणाऱ्याने त्याचे नाव मनोज असे सांगितले आणि तो फोन पे कंपनीतून बोलत असल्याचे त्यांना म्हणाला. त्याच्या कंपनीची सेफ गोल्ड इन्व्हेस्टमेंट ही योजना आहे. या योजनेत गुंतवणूक केल्यास तेवढीच रक्कम कॅशबॅक (परत) मिळेल असे आमिष दाखविले. तुम्हाला एक लिंक पाठवीत आहोत. त्यावर क्लीक करून रक्कम पाठवा, असे सांगितल्यानंतर तरुणीने फोन पेवरून ९९९ रुपये आणि ४९९ रुपये आॅनलाईन पाठविले.
मात्र, तिला रक्कम परत मिळाली नाही. एवढेच नव्हे तर सेफ गोल्डचे नोटीफिकेशनही तिला मिळाले नाही. यानंतर तिच्या फोन पे अॅप्लीकेशनवर वारंवार नोटीफिकेशन आले आणि तिने ते नाकारले. तिच्या खात्यातील रक्कम कमी होत गेली. पुन्हा तिला कॉल आला तेव्हा तिला गुंतवणूक करायची नाही. तिची रक्कम तिने परत मागितली. मात्र त्याने ही रक्कम परत केली नाही. ३० नोव्हेंबर ते ८ डिसेंबरदरम्यान ३ लाख ९७ हजार ५८९ रुपयांची फसवणूक झाल्याची तक्रार तिने पोलिसांत नोंदविली. पोलीस निरीक्षक के. सी. देशमाने तपास करीत आहेत.
तरुणीने मेसेजवर ठेवला विश्वास
३ डिसेंबर रोजी भामट्याने तिला कॉल करून तुमची रक्कम तुम्हाला परत करण्यासाठी एक मेसेज पाठविला आहे. हा मेसेज कॉपी करून पाठवा. त्याच्यावर विश्वास ठेवून तरुणीने मेसेज पाठविल्यानंतर तिचे बँकखाते भीम अॅपसोबत जोडण्यात आल्याचा मेसेज आला आणि त्याच दिवशी तिच्या खात्यातून ३४ हजार ९९८ रुपये कपात झाले. ३० हजार रुपये, ३१ हजार १०० रुपये, ९९ हजार ९९७ रुपये, ९९ हजार ९९८ रुपये कपात झाले.