PIB Fact Check: १० हजार भरून या सरकारी योजनेत मिळताहेत ३० लाख रुपये, जाणून घ्या या व्हायरल मेसेजमागील सत्य
By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2022 08:27 PM2022-05-11T20:27:25+5:302022-05-11T20:28:18+5:30
PIB Fact Check: केवळ १० हजार १०० रुपये जमा केल्यावर सरकार तुम्हाला ३० लाख रुपये देत आहे, असा मेसेज तुमच्यापर्यंत आला असेल तर त्वरित सावध व्हा.
नवी दिल्ली - केवळ १० हजार १०० रुपये जमा केल्यावर सरकार तुम्हाला ३० लाख रुपये देत आहे, असा मेसेज तुमच्यापर्यंत आला असेल तर त्वरित सावध व्हा. या योजनेबाबत सरकारने एक पत्र जारी केलं आहे, असा दावा करण्यात येत आहे. भारत सरकार आणि अशोक स्तंभासह सर्क्युलेट होणाऱ्या या पत्रामधून तुमच्या अकाऊंटमध्ये ३० लाख रुपये जमा केले आहेत, असा दावा करण्यात येत आहे.
या पत्रात पुढे म्हटले आहे की, ही रक्कम लगेच खात्यात दिसणार नाही कारण ती प्रोसेसमध्ये आहे. ती प्रोसेस पूर्ण करण्यासाठी तुम्हाला १० हजार १०० रुपयांचा परमिशन चार्ज द्यावा लागेल. जाणून घेऊयात नेमकं काय आहे प्रकरण.
आजकाल सायबर फसवणुकीची प्रकरणं वेगाने वाढत आहेत. सायबर ठक खूप चालाख झाले आहेत. सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असलेल्या या पत्रामागेही एक सायबर ठक आहे. यामध्ये लोकांना एका सरकारी स्कीमच्या नावावर ३० लाख रुपये देणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
सरकारी एजन्सी प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोने एक ट्विट करून याची माहिती दिली आहे. पीआयबी फॅक्ट चेकने सांगितले की, हे पत्र पूर्णपणे खोटे आहे. तसेच कुठल्याही सरकारी योजनेशी त्याचं देणंघेणं नाही आहे. म्हणजेच ही सायबर ठकाची एक चाल आहे. अशा परिस्थितीत जर तुमच्याकडेही हे पत्र आलं तर ते कुणालाही शेअर करू नका. पीआयबीने सांगितलं की, बोगस ठक लोकांनी सर्वसामान्यांना गंडा घालण्यासाठी या बनावट सरकारी पत्राचा आधार घेतला आहे, त्यामुळे तुम्ही चुकूनही या पत्राची मदत घेऊ नका.