पत्नीस आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पतीला अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2019 02:44 AM2019-03-18T02:44:42+5:302019-03-18T02:44:49+5:30
पतीकडून वारंवार होणाऱ्या छळाला कंटाळून पत्नीने गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी पत्नीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पतीवर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.
पिंपरी : पतीकडून वारंवार होणाऱ्या छळाला कंटाळून पत्नीने गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी पत्नीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पतीवर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.
हर्षदा सत्यजित लंकेश्वर (वय २४, रा. अनुराज बंगल्याच्या पार्किंगमध्ये, टेल्को कॉलनी, संतनगर, मोशी) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. तर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी त्यांचे पती सत्यजित विजय लंकेश्वर (वय ३०) याच्यावर गुन्हा दाखल करून अटक केली आहे.
याप्रकरणी विवाहितेचे वडील राजाराम महादेव जगताप (वय ५६, रा. शितोळेनगर, नवी सांगवी) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, लग्नात माहेराहून काही आणले नाही या कारणावरून सत्यजित हा हर्षदा यांचा वारंवार शिवीगाळ व मारहाण करीत छळ करीत होता. या छळास कंटाळून हर्षदा यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.
दरम्यान, हर्षदा यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात सत्यजित लंकेश्वर याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. पोलीस अधिक तपास करीत आहेत.