सराईत गुन्हेगाराकडून पिस्तूल व दोन जिवंत काडतुसे जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2018 04:21 PM2018-11-27T16:21:45+5:302018-11-27T16:22:17+5:30
दहशत माजविण्यासाठी बेकायदा पिस्तूल बाळगणाऱ्या सराईत गुन्हेगाराला दत्तवाडी पोलिसांच्या तपास पथकाने जेरबंद केले आहे.
पुणे : दहशत माजविण्यासाठी बेकायदा पिस्तूल बाळगणाऱ्या सराईत गुन्हेगाराला दत्तवाडी पोलिसांच्या तपास पथकाने जेरबंद केले आहे. त्याच्याकडून एक पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक देविदास घेवारे यांनी सांगितले.
तेजस शंकर पडवळ (वय २४, रा. गल्ली क्रमांक ९१, जनता वसाहत) असे अटक आरोपीचे नाव आहे. पोलीस आयुक्त के. व्यंकटेशम यांच्या सुचनांनुसार सध्या सराईतांच्या हालचालींवर विशेष लक्ष ठेवण्यास पोलिसांनी सुरुवात केली आहे. दत्तवाडी पोलीस ठाण्याच्या तपास पथकाचे पोलीस नाईक सोमेश्वर यादव व पोलीस शिपाई रोहन खैरे यांना खबऱ्यामार्फत आरोपीबाबत माहिती मिळाली.
निळ्या रंगाची जीन्स आणि शर्ट घातलेल्या तरुणाकडे बेकायदा शस्त्र असून तो जनता वसाहतीमधील राममंदिराजवळ उभा असल्याचे पोलिसांना समजले. त्यानुसार, वरिष्ठ निरीक्षक घेवारे यांच्या आदेशानुसार, उपनिरीक्षक अनिल डफळ, तानाजी निकम, रविंद्र फुलपगारे, सुधीर घोटकुले, सोमेश्वर यादव, महेश गाढवे, रोहन खैरे, सागर सुतकर, विकास कदम, शरद राऊत, शिवाजी क्षिरसागर, राहूल ओलेकर, अमित सुर्वे यांनी सापळा लावला.
उपलब्ध वर्णनातील आरोपी पडवळ याला तत्काळ ताब्यात घेण्यात आले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे बेकायदा अग्निशस्त्र आणि काडतुसे मिळून आली. पुढील तपास पोलीस हवालदार रविंद्र हवालदार करीत आहेत.