दीड वर्षापूर्वी सचिनकडे पाहिले पिस्टल; शुभम सुरळेने तपास यंत्रणेला दिली माहिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2018 01:58 PM2018-08-24T13:58:07+5:302018-08-24T14:05:28+5:30
रोहित रेगेच्या घरातून जप्त केलेले ‘ते’ पिस्टल मागील दीड वर्षापूर्वीच सचिन अंदुरेकडे पाहिल्याचे शुभम सुरळे याने तपास यंत्रणेला सांगितले
औरंगाबाद : डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या कटातील संशयित आरोपी रोहित रेगेच्या घरातून जप्त केलेले ‘ते’ पिस्टल मागील दीड वर्षापूर्वीच सचिन अंदुरेकडे पाहिल्याचे शुभम सुरळे याने तपास यंत्रणेला सांगितल्याचे सूत्रांकडून समजते आहे. ही घातक शस्त्रे विनापरवाना बाळगण्याचा आरोपींचा आणखी काय उद्देश होता, हे शोधून काढण्याकडे पोलिसांनी लक्ष केंद्रित केले आहे.
डॉ. दाभोलकर हत्येची पाळेमुळे खोदण्यावर सीबीआय व एटीएसच्या पथकांनी भर दिला असून, अटकेतील संशयित, रोहित, शुभम व अजिंक्य या आरोपींना बोलते करण्याचा प्रयत्नही सुरू आहे. बुधवारी पहाटे अटक केलेले तिन्ही आरोपी सध्या कोठडीत आहेत. शुभमने पोलिसांना सांगितल्यानुसार त्याने ते पिस्टल दीड वर्षांपूर्वी सचिनकडे पाहिलेय, त्याने दिलेल्या माहितीची सत्यता पडताळली जात आहे.
डॉ. नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे, कलबुर्गी आणि गौरी लंकेश यांची हत्या करण्यासाठी वापरलेल्या ‘मोडस् आॅपरेंडी’त साम्य आहे. त्यामुळे हेच पिस्टल चारही गुन्ह्यांत वापरले गेले काय? किती गोळ्या वापरल्या? हत्या घडल्या तेथील घटनास्थळाचे मिळालेले फुटेज, पंचनामे यादृष्टीनेदेखील
सीबीआयची पथके तपास करीत आहेत.
औरंगाबादेत सचिनचे वर्षानुवर्षे घातक शस्त्र सांभाळणे व नंतर विल्हेवाट करण्यासाठी साला शुभमकडे दिल्यानंतर त्याची कुठेही वाच्यता न करता खबरदारी बाळगली जाणे. या घटनेत नेमके काय-काय दडलेय, पिस्टलचा प्रवास तिघांकडे कसा झाला, त्यावरून एक-एक साखळी तपास पथक जोडत चालले आहे. शुक्रवारी तिघांचीही पोलीस कोठडी संपत असून, सिटीचौक पोलीस त्यांना उद्या न्यायालयात दाखल करून पोलीस कोठडीची मुदत वाढवून मागणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. वाढीव कोठडीसाठी पोलीस तपासातील काही नवीन मुद्दे सादर करण्यात येणार असल्याचे कळते.