'त्या' पिस्तुलचा 'कोड वर्ड' होता 'सुदर्शन चक्र', त्यानेच केली चौघांची हत्या!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2018 06:18 PM2018-08-28T18:18:58+5:302018-08-28T19:33:17+5:30
७.६५ एमएम पिस्तूलला 'सुदर्शन चक्र' असे नाव दिले असल्याची माहिती काळेने कर्नाटक एसआयटीला दिली असल्याची खळबळजनक माहिती सूत्रांनी दिली.
मुंबई - नालासोपाऱ्यात १० ऑगस्ट रोजी वैभव राऊत आणि शरद कळसकर यांच्याकडे एटीएसला शस्त्र साठा सापडल्यानंतर पुरोगामी विचारांची हत्या करणारे आरोपी हळूहळू तपास यंत्रणांच्या हाती लागले. त्यानंतर डॉ. नरेंद्र दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी आणि पत्रकार गौरी लंकेश हत्येचा गुंता सुटायला लागला. कर्नाटक एसआयटीने गौरी लंकेश हत्येप्रकरणी पुण्यातून अमोल काळेला अटक केली होती. अमोल काळेकडे असलेल्या पिस्तुलीने या चारही जणांची हत्या केल्याची काळेने कबुली दिली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. ७.६५ एमएम पिस्तूलला 'सुदर्शन चक्र' असे नाव दिले असल्याची माहिती काळेने कर्नाटक एसआयटीला दिली असल्याची खळबळजनक माहिती सूत्रांनी दिली. तसेच महाराष्ट्रात देखील एटीएसने धरपकड करत पाच जणांना अटक केली. यांच्या चौकशीतून पुण्यातील सनबर्न या वेस्टर्न म्युझिकल कॉन्सर्टमध्ये बॉम्बस्फोट करण्याचा प्रयत्न होता. तसेच पद्मावत चित्रपटालाही विरोध आणि कल्याणच्या भानुसागर तर बेळगावच्या प्रकाश चित्रपटगृहात बॉम्बस्फोट घडविल्याची माहिती न्यायालयात देण्यात आली. त्यानंतर न्यायालयाने वैभव राऊत, शरद कळसकर, सुधन्वा गोंधळेकर आणि श्रीकांत पांगारकर यांच्या पोलीस कोठडीत ७ दिवसांनी वाढ केली आहे.
दोन दिवसांपूर्वीच घाटकोपरच्या भटवाडीतून अविनाश पवारला देखील एटीएसने अटक केली आहे. तसेच कर्नाटक एसआयटीचे अधिकारी शनिवारी मुंबईत या पाच जणांच्या चौकशीसाठी आले होते. तसेच आज देखील हे अधिकारी पुन्हा आले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. कर्नाटक एसआयटीच्या चौकशीत अमोल काळे हाच या चार हत्येमागील मुख्य सूत्रधार असल्याचे स्पष्ट झाले आहे. राजेश बांगरने शस्त्र आणि वाहन पुरविले असून अमित डेगवेकर हा पैसा पुरवत होता असल्याचे कर्नाटक एसआयटीच्या चौकशीत उघड झाले आहे. परशुराम वाघमारेला अमोल काळेनेच गोळ्या झाडण्यासाठी नेमले होते अशी कबुली वाघमारे देखील याआधी दिली आहे.
कर्नाटक एसआयटी मुंबईत; पाचही आरोपींची केली पाऊण तास चौकशी