कुख्यात गुंडांकडून पिस्तूल जप्त; मोठा गुन्हा करण्याच्या होते तयारीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2021 08:58 PM2021-08-12T20:58:46+5:302021-08-12T20:59:07+5:30
तहसील पोलिसांनी बांधल्या मुसक्या
नागपूर : उत्तर नागपुरातील गुंडांच्या एका टोळीला पोलिसांनी अटक करून त्यांच्याकडून एक पिस्तूल जप्त केले. मेयो चाैकाजवळ गुरुवारी पहाटे २च्या सुमारास तहसील पोलिसांनी ही कारवाई केली.
नयन मनोज लोखंडे (वय २१, रा. लष्करीबाग), परवेज अली ऊर्फ सोनू करामत अली (वय २७, रा.न्यू म्हाडा क्वॉर्टर, कपिलनगर) आणि शेख सलमान शेख कलिम (वय ३०, रा. सम्राटनगर) अशी आरोपींची नावे आहेत. हे तिघेही अट्टल गुन्हेगार असून त्यांच्याविरुद्ध हत्येचा प्रयत्न, लुटमार, हल्ला असे अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. बुधवारी मध्यरात्रीपर्यंत त्यांनी ओली पार्टी केली आणि दारूच्या नशेत तर्र असलेले हे गुंड नंतर मोठा गुन्हा करण्याच्या उद्देशाने सेंट्रल एव्हेन्यूकडे निघाले.
मेयो चाैकात गस्तीवर असलेल्या तहसील पोलिसांच्या पथकाला ते दिसले. त्यांचा संशय आल्याने पोलिसांनी त्यांना कारमधून खाली उतरवून त्यांची झडती घेतली असता आरोपी परवेजकडे मॅगझिन असलेले पिस्तूल आढळले. हे पिस्तूल, चार फोन आणि कार (एमएच ३१- सीएन २७३) असा सुमारे पाच लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. आरोपी मोठा गुन्हा करण्याच्या तयारीत असल्याचा संशय आहे. पोलीस उपायुक्त लोहित मतानी, ठाणेदार जयेश भांडारकर, पीएसआय एस. एस. मस्के, नायक पंकज सुरजुसे, नायक दामोदर, अतुल आणि वैभव यांनी ही कामगिरी बजावली.