सनबर्न फेस्टिव्हलमध्ये घातपात करण्याचा होता कट
By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2018 07:08 PM2018-08-28T19:08:53+5:302018-08-28T19:18:18+5:30
Sanatan Sanstha : शरद कळसकरने डॉ. नरेंद्र दाभोळकरप्रकरणी आपला हात असल्याची कबुली दिल्यानंतर केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (सीबीआय) त्याचा ताबा मागितला असून यावर उद्या सत्र न्यायालयात पुन्हा सुनावणी होण्याची शक्यता आहे.
मुंबई - नालासोपारा येथे सापडलेल्या स्फोटकांप्रकरणी आज शरद केळसकरसह अन्य तिघांना सत्र न्यायालयात आज हजर करण्यात आले. याप्रकरणातील वैभव राऊत, श्रीकांत पांगारकर, शरद कळसकर आणि सुधन्वा गोंधळेकर या ४ आरोपींना ३ सप्टेंबरपर्यंत एटीएस कोठडी सुनावण्यात आली आहे. या आरोपींपैकी शरद कळसकरला पुण्यातील सनबर्न फेस्टिव्हलमध्ये स्फोट घडवून आणण्याचा कट होता. स्फोट घडवण्यासाठी श्रीकांत पांगारकर आर्थिक मदत करणार होता अशी माहिती कळसकरजवळ असलेल्या संगणकामधून मिळाल्याची माहिती एटीएसने सुनावणीदरम्यान न्यायालयात दिली आहे.
नालासोपारा स्फोटक आणि शस्त्रसाठाप्रकरणी एटीएसच्या अटकेत असलेल्या शरद कळसकर, वैभव राऊत, सुधन्वा गोंधळेकर आणि श्रीकांत पांगरकर यांची पोलिस कोठडी आज संपली. याच पार्श्वभूमीवर आज या चारही आरोपींना सत्र न्यायालयात हजर करण्यात आले होते. या सुनावणीदरम्यान आरोपींचा पुण्यातील सनबर्न फेस्टिव्हलमध्ये स्फोट घडवून आणण्याचा कट होता अशी माहिती एटीएसने न्यायालयाला दिली. तसेच पद्मावत चित्रपटालाही विरोध आणि कल्याणच्या भानुसागर तर बेळगावच्या प्रकाश चित्रपटगृहात बॉम्बस्फोट घडविल्याची माहिती न्यायालयात देण्यात आली. दरम्यान, सचिन अंदुरे आणि शरद कळसकर या दोघांची समोरासमोर चौकशी करण्यात आली असल्याचे देखील सांगण्यात आले. शरद कळसकरने डॉ. नरेंद्र दाभोळकरप्रकरणी आपला हात असल्याची कबुली दिल्यानंतर केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (सीबीआय) त्याचा ताबा मागितला असून यावर उद्या सत्र न्यायालयात पुन्हा सुनावणी होण्याची शक्यता आहे.