किरण गोसावीने रचला कट?; गोसावी, डिसूजाच्या सीडीआरमधून उलगडणार आरोपांचे गूढ
By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2021 06:52 AM2021-11-10T06:52:42+5:302021-11-10T06:53:06+5:30
लवकर होणार गुन्हा दाखल
मुंबई : कार्डेलिया क्रुझवरील ड्रग्ज पार्टी प्रकरणात किरण गोसावीने मोठा कट आखल्याची माहिती मुंबई पोलिसांच्या एसआयटीच्या प्राथमिक चौकशीतून समोर येत आहे. दुसरीकडे गोसावी आणि सॅम डिसुजाच्या सीडीआरमधूनदेखील या खंडणीच्या आरोप प्रकरणाचे गूढ उकलण्यास मदत होणार आहे. त्यानुसार, मुंबई पोलीस लवकरच या प्रकरणात किरण गोसावीसह सॅम डिसूजा विरोधात गुन्हा दाखल करणार असल्याचेही समजते आहे.
मुंबई पोलीस प्रभाकर साईलच्या तक्रारीवरून खंडणी, तसेच फसवणुकीचा गुन्हा दाखल करणार आहेत. पैसे उकळण्यासाठी किरण गोसावीने या प्रकरणात स्वतःची ओळख एनसीबी अधिकारी म्हणून केली असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले. गोसावीने ही ओळख पूजा ददलानीला सांगितली होती, असेही समजते आहे. त्याने पैसे उकळण्यासाठी खोटी ओळख केल्याचे पथकाच्या प्राथमिक तपासात समोर येत आहे. या प्रकरणात कोणत्याही एनसीबी अधिकाऱ्याचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष सहभाग तूर्तास तरी चौकशीत आढळून आलेला
नाही, अशी माहिती अधिकाऱ्याने दिली आहे. त्यामुळे या प्रकरणात पूजा ददलानीचा जबाब खूप महत्त्वाचा आहे. मुंबई पोलिसांनी त्यांनाही समन्स बजावत चौकशीला हजर राहण्यास सांगितले होते.
पूजा यांनी प्रकृतीचे कारण देत मुंबई पोलिसांकडे वेळ मागितला आहे. पूजा ददलानी येत्या शुक्रवारी चौकशीला येणार असल्याची शक्यता आहे. या चौकशीत आणखी खुलासे होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यावेळी मुंबई पोलीस एसआयटी टीम एनसीबी अधिकाऱ्यांचीदेखील चौकशी करणार आहे.
सॅम डिसूजा आणि किरण गोसावीचे ते ३० कॉल
मुंबई पोलिसांना किरण गोसावी आणि सॅम डिसूजाचे सीडीआर मिळाले आहेत. त्यामध्ये कार्डेलिया क्रूझवरील कारवाईनंतर मध्यरात्री ते पहाटेपर्यंत दोघांकडून वेगवेगळ्या क्रमांकावर ३० कॉल करण्यात आले होते. गोसावी आणि डिसूजा यांनी हे कॉल कुणाला केले होते? याबाबत पोलीस अधिक तपास करीत आहेत.
सीसीटीव्हीद्वारे तपास सुरू
मुंबई पोलिसांच्या पथकाला महत्त्वाचे सीसीटीव्ही फुटेजदेखील मिळाले आहेत. त्यानुसारही तपास सुरू आहे. हे सीसी टीव्ही फुटेज लोअर परळ परिसरातील आहे. या सीसीटीव्ही फुटेजमध्ये शाहरुख खानची मॅनेजर पूजा दादलानी हिची निळ्या रंगाची मर्सिडीज कार दिसत आहे. ज्या ठिकाणी ही मर्सिडीज कार दिसत आहे. त्याच ठिकाणी २५ कोटींची खंडणीची डील झाली असल्याचा दाट संशय व्यक्त करण्यात येत आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये निळ्या रंगाची मर्सिडीज दिसत आहे. त्यासोबतच शेजारी एक इनोव्हा कारही दिसत आहे. ही इनोव्हा पंच किरण गोसावी याची असल्याचाही पोलिसांना संशय आहे. त्यानुसार पथक तपास करीत आहे.