पत्नीच्या मदतीने रचला कट, हनी ट्रॅपद्वारे व्यावसायिकाकडे ५० लाखांची खंडणीची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2020 08:50 PM2020-09-04T20:50:07+5:302020-09-04T21:38:31+5:30
खंडणी विरोधी पथकाकडून आरोपी जेरबंद
पुणे : हनी ट्रॅपद्वारे वडगाव शेरी येथील एका व्यावसायिकाला ५० लाखांच्या खंडणीची मागणी करणाऱ्याला खंडणी विरोधी पथकाने सापळा लावून पकडले. चंदननगरमधील २६ वर्षाच्या तरुणाला पुणे स्टेशन परिसरात ५ लाख रुपयांची खंडणीची रक्कम स्विकारताना पकडण्यात आले. याप्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी सांगितले की, तक्रारदार यांचा किचनचे साहित्य तयार करण्याचा व्यवसाय आहे. वडगाव शेरी परिसरात त्यांची पूर्ण इमारत आहे. त्यामध्ये दुसर्या मजल्यावर ते राहतात़ इतर खोल्या त्यांनी भाड्याने दिल्या आहेत. पहिल्या मजल्यावरील एक खोली रिकामी झाल्याने त्यांनी ती आरोपीला भाड्याने दिली होती. इमारतीच्या पार्किंग परिसरात ते दररोज सकाळी फिरण्यासाठी येत होते़ त्यावेळी आरोपीच्या पत्नीने त्यांना पाहिले़ त्यांना अश्लिल मेसेज पाठवून भेटायला बोलावले़ आरोपी घरी नसताना या महिलेने या व्यावसायिकाला घरी बोलावले़ त्यावेळी त्यांच्यात सहमतीने शारिरीक संबंध निर्माण झाले़ त्यानंतर आरोपीची पत्नी या व्यावसायिकाशी फोन करुन सतत बोलत असत़ त्यानंतर तिने एके दिवशी या व्यावसायिकाला पुन्हा घरी बोलावून घेतले़ त्यावेळी आरोपी घरातच होता़ दोघांना एकत्र पाहिल्यावर आरोपीने या व्यावसायिकाला मारहाण करुन त्याचा मोबाईल हिसकावून घेतला़
तसेच दुसऱ्या दिवशी खोली सोडून जात असल्याचे सांगितले आणि खरोखरच तो दुसऱ्या दिवशी खोली सोडून गेला़ त्यानंतर काही दिवसांनी आरोपीने या व्यावसायिकाला फोन करुन तुझे व माझ्या पत्नीचे संबंध असल्याची मला कल्पना होती़ त्यामुळे मी अगोदरच घरात सीसीटीव्ही लावून त्याचे व्हिडिओ चित्रीकरण केले होते, असे सांगितले़ तु रहात असलेल्या परिसरात हे व्हिडिओ व्हायरल करतो, अशी धमकी दिली़ हे प्रकरण मिटविण्यासाठी ५० लाख रुपयांची खंडणी मागितली़ त्यासाठी आरोपी सातत्याने फोन करुन धमकी देऊ लागला़ तेव्हा या व्यावसायिकाने पोलीस आयुक्तालयात अर्ज केला़ गुन्हे शाखेचे अपर पोलीस आयुक्त अशोक मोराळे, पोलीस उपायुक्त बच्चनसिंह यांनी खंडणी विरोधी पथकाचे निरीक्षक राजेंद्र मोहिते यांच्या पथकाला कारवाई करण्यास सांगितले. या व्यावसायिकाची तक्रार घेतली जात असतानाच आरोपीचा त्यांना फोन आला व ५ लाख रुपयांची मागणी त्याने केली़ त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक निलेश महाडिक व त्यांच्या सहकाऱ्यांनी पुणे स्टेशनजवळ सापळा लावला़ या व्यावसायिकाकडून ५ लाख रुपये घेण्यास आलेल्या आरोपीला पकडण्यात आले.
अन्य महत्वाच्या बातम्या...
खळबळजनक! भाजपा पदाधिकाऱ्याच्या मुलाची चाकूने वार करून हत्या, हल्लेखोर फरार
सुशांतच्या चॅटमधून मोठा खुलासा, बहिणीने एंजाइटी-डिप्रेशनचे औषध घेण्यासाठी दिला होता सल्ला
Sushant Singh Rajput Case : रियाला शवगृहात जाण्यासाठी परवानगी दिलीच नव्हती, कूपर रुग्णालयाचा खुलासा
बापरे! ९० हजाराहून अधिक तरुणांनी २०१९ मध्ये केली आत्महत्या, पहा NCRB चा अहवाल