पार्श्वगायक अभिजित भट्टाचार्य यांचीही गणेश केंजळेने केली फसवणूक
By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2022 09:32 PM2022-01-18T21:32:19+5:302022-01-18T21:40:35+5:30
Cheating Case : याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पार्श्वगायक अभिजित भट्टाचार्य यांचे भुकुंम येथील परांजपे लेक व्ह्यु इस्टेटमधील गट नं. ३०५ मध्ये २० गुंठे क्षेत्र असून त्यांनी तेथे बंगला बांधला आहे.
पुणे : जमीन शिल्लक नसतानाही जादा जमीनची विक्री करुन फसवणूक करणाऱ्या गणेश केंजळे याने प्रसिद्ध पार्श्वगायक अभिजित भट्टाचार्य यांचीही फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. लघु उद्योजक मिलिंद महाजन यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन ग्रामीण पोलीस दलाच्या आर्थिक गुन्हे शाखेने गणेश केंजळे व महेश केंजळे (दोघे रा. शिवतीर्थनगर, पौड रोड, कोथरुड) यांना अटक केली आहे.
याची माहिती मिळाल्यावर पार्श्वगायक अभिजित भट्टाचार्य यांनी पौड पोलिसांकडे फिर्याद दिली असून त्यावरुन पोलिसांनी गणेश केंजळे याच्याविरुद्ध आणखी एक फसवणूकीचा गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पार्श्वगायक अभिजित भट्टाचार्य यांचे भुकुंम येथील परांजपे लेक व्ह्यु इस्टेटमधील गट नं. ३०५ मध्ये २० गुंठे क्षेत्र असून त्यांनी तेथे बंगला बांधला आहे. ते तेथे अधूनमधून येऊन रहात असतात. २०१० मध्ये ते कुटुंबासह भुकुंम येथे रहायला आले असताना गणेश केंजळे यांनी त्यांची भेट घेऊन तुमच्या बंगल्याला लागूनच माझी जमीन आहे. तुम्हाला पाहिजे असेल तर ती मी विकत द्यायला तयार आहे. तुम्ही शेजारी आहे, म्हणून तुम्हाला प्राधान्य देत आहे, असे सांगितले.
त्यांच्या कंपाऊंडला लागून असलेले क्षेत्र केंजळे याने दाखविल्याने त्यांना आवडले व त्यांनी ३६ आर जमीन ३८ लाख ८० हजार रुपयांना विकत घेतली. खरेदी केलेल्या जमिनीचे सपाटीकरण करुन तेथे कुत्रिम तलाव बांधला. भिंतीचे कुंपण करुन घेतले. काही दिवसांपूर्वी त्यांनी ७/१२ उतारा ऑनलाईन चेक केला असता त्यांच्या नावासमोर ४.६६ आर क्षेत्र दिसून आले. या गटातील जमिनीची अतिरिक्त विक्री झाल्याने काही खरेदीदारांच्या नावासमोर क्षेत्र शिल्लक नसल्याचे दिसून आले. मुळशी तहसीलदार यांच्या निकालावरुन भट्टाचार्य यांच्या नावावर ४.६६ क्षेत्र शिल्लक ठेवून उरलेले ३२ आर क्षेत्र अतिरिक्त ठरवले आहे. त्यामुळे गणेश केंजळे याने ३६ आरची विक्री करुन ३८ लाख ८० हजार रुपये घेतले. प्रत्यक्षात त्याने ३२ आर क्षेत्राची ३३ लाख ७७ हजार ७५५ रुपयांची फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे