कोरोनाशी लढण्यास खेळाडू सरसावले; संघटनांनीही जपली सामाजिक बांधिलकी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2020 04:17 AM2020-03-30T04:17:45+5:302020-03-30T06:18:05+5:30
कुणी थेट रस्त्यावर बंदोबस्तात, तर अनेकांनी केली सढळ हाताने मदत
नवी दिल्ली : कोविड १९ हे जगावर आलेले मोठे संकट आहे. या संकटकाळात घरी बसण्यासोबतच क्रीडा संघटना आणि खेळाडू यांनी आपल्यातील संवेदनशीलतेचा प्रत्यय आणून दिला आहे. सचिन तेंडुलकर, सुरेश रैना, बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांच्या पावलावर पाऊल ठेवत अजिंक्य रहाणे याने देखील मदतीचा हात पुढे केला आहे. तर इंग्लडची महिला खेळाडू हिथर नाईट ही स्वयंसेवक बनणार आहे. क्रीडा मंत्री किरेन रिजुजु यांनी देखील एक महिन्याचा पगार मदत म्हणून दिला आहे.
भारतीय कसोटी संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेने कोविड-१९ महामारीविरुद्धच्या लढाईसाठी महाराष्ट्र मुख्यमंत्री साहाय्यता निधीमध्ये १० लाख रुपयांचे डोनेशन दिले. रहाणेच्या एका नजीकच्या सूत्राने रविवारी याला दुजोरा दिला. त्यामुळे या महामारीविरुद्धच्या लढाईत योगदान देणाऱ्या खेळाडूंच्या यादीत त्याचा समावेश झाला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय जनता पक्षाच्या संसद सदस्यांना कोरोनाविरुद्धच्या लढाईत आर्थिक योगदान देण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत क्रीडामंत्री किरेन रिजीजू यांनी एक महिण्याचे वेतन देण्याचा निर्णय घेतला आहे. रिजिजू यांनी फेसबुक पेजवर लिहिले आहे की, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपत्ती निवारण क्षमता मजबूत करण्यासाठी पंतप्रधान मदत निधीची घोषणा केली आहे. मी यासाठी माझे एक महिन्याचे वेतन देत आहे.’ त्यांनी लिहिले आहे,‘ मी या दरम्यान सातत्याने जिल्हा प्रशासनाच्या संपर्कात आहे. आपत्कालिक मेडिकल किट खरेदी करण्यासाठी माझ्या खासदार फंडाचा वापर करण्याच्या सूचना नोडल अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
आयसीसीने केली जोगिंदर शर्माची प्रशंसा
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) कोविड-१९ महामारीविरुद्धच्या लढाईत योगदान देण्यासाठी भारताचा क्रिकेटपटू आणि सध्या पोलीस अधिकारी असलेल्या जोगिंदर शर्माची प्रशंसा केली. पाकिस्तानविरुद्ध २००७ विश्व टी-२० फायनलमध्ये अखेरच्या षटकात विजय मिळवून देणारा जोगिंदर हरियाणा पोलीसमध्ये डीएसपी (पोलीस उपअधीक्षक) आहे.
आयसीसीने शनिवारी जोगिंदरचे क्रिकेटपटू व पोलीस अधिकारी म्हणून छायचित्र शेअर करताना टिष्ट्वट केले, ‘क्रिकेट कारकिर्दीनंतर पोलीस अधिकारी म्हणून भारताचा जोगिंदर शर्मा विश्व स्वास्थ्य संकटात आपले योगदान देत आहे.’
जोगिंदरचा फोटो सोशल मीडियात चांगलाच व्हायरलदेखील झाला आहे.
स्वयंसेवक संघात हिथर नाईट
लंडन : कोरानाविरुद्ध लढण्यासाठी इंग्लंडने आखलेल्या मोहिमेत आता महिला क्रिकेट संघाची कर्णधार हिथर नाइट हिने सहभाग घेतला आहे. राष्ट्रीय आरोग्य सेवाच्या (एनएचएस) या उपक्रमात ती स्वयंसेवक म्हणून भूमिका पार पाडणार आहे. नाइटने औषध पोहोचवण्यासाठी पुढाकार घेतला आहे. ती लोकांची सेवा करीत आहे.
ब्रिटेनमध्ये आतापर्यंत १४,५४३ कोरोनाबाधित रुग्ण आहेत. या महारोगाविरुद्ध लढण्यासाठी प्रत्येकाने आपल्या पातळीवर योगदान द्यावे, असे तिने म्हटले आहे.
कर्नाटक राज्य क्रिकेट संघटनाने रविवारी कोरोना विरुद्धच्या लढाईसाठी केंद्र व राज्य सरकारला प्रत्येकी पन्नास लाख रुपये देण्याची घोषणा केली.
महिला विश्वचषक स्पर्धेत भारताचे प्रतिनिधीत्व करणाºया १६ वर्षाच्या ऋचा घोषने बंगाल मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी एक लाख रुपयांची मदत दिली आहे. ऋचाचे वडील मानाबेंद्रा घोष यांनी शनिवारी सिलीगुडी जिल्हाधिकाºयांच्या कार्यालयात जाऊन या मदतीचा धनादेश दिला.’
आशियाई पॅरा स्पर्धेतील उंचउडीचा सुवर्ण विजेता शरद कुमार याने देखील एक लाख रुपये पंतप्रधान मदत निधीसाठी दिले आहेत. त्याने टी४२ गटात सुवर्ण मिळवले होते. युवा नेमबाज ईशा सिंगने कोरोना विषाणूविरुद्धच्या लढाईसाठी रविवारी पंतप्रधान मदत निधीमध्ये ३० हजार रुपये दान केले. १५ वर्षीय ईशा या महामारीविरुद्धच्या लढाईत आर्थिक योगदान देणारी सर्वात युवा खेळाडू ठरली. ईशाने ट्वीट केले की, ‘ मी माझ्या बचतीतून ३० हजार रुपयांचे योगदान देत आहे.’ देश आहे, तरंच आपण आहोत.’