Bribery case : सकाळी घेतली प्रतिज्ञा, मध्यरात्री स्वीकारली लाच; 'शाहूपुरी'चा पोलीस गजाआड!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2021 06:13 AM2021-10-28T06:13:04+5:302021-10-28T06:13:15+5:30
Bribery case : तक्रारदाराने विकलेली मोटारकार अपुऱ्या व्यवहारामुळे त्याने परत मिळण्यासाठी शाहूपुरी पोलिसांशी संपर्क साधला.
कोल्हापूर : ‘लाच घेणार नाही’,अशी सकाळी प्रतिज्ञा घेतली अन् रात्रीच पाच हजार रुपयांची लाच घेतली. लाच घेताना शाहूपुरी पोलीस ठाण्याचा अंमलदार सागर इराप्पा कोळी (वय ४६, रा. श्रीरामनगर, उचगाव, ता. करवीर) याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. वादातील कार परत मिळवून दिल्याबद्दल तक्रारदाराकडे संबंधिताने १५ हजार लाचेची मागणी केल्याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक आदिनाथ बुधवंत यांनी दिली.
मंगळवारपासून भ्रष्टाचारविरोधी दक्षता जनजागृती सप्ताहाला प्रारंभ झाला. यासाठी सकाळी जिल्ह्यातील सर्वच शासकीय व निमशासकीय कार्यालयात लाच घेणार नाही, भ्रष्टाचार करणार नाही अशी प्रतिज्ञा सर्व कर्मचाऱ्यांनी घेतली आणि त्याच रात्री लाचखोर पोलिसाला गजाआड व्हावे लागले. दरम्यान, तक्रारदाराने विकलेली मोटारकार अपुऱ्या व्यवहारामुळे त्याने परत मिळण्यासाठी शाहूपुरी पोलिसांशी संपर्क साधला. त्यानंतर पोलिसांनी मोटारीबाबत संबंधिताशी चर्चा केल्यानंतर मोटारकार पोलीस ठाण्यात आणून लावली. त्यांतर ती मूळ मालकाला परत दिली.
मोटार परत मिळवून दिल्याबद्दल शाहूपुरी पोलीस ठाण्यातील शिपाई सागर कोळी याने मूळ मालकाकडे १५ हजार रुपये लाचेची मागणी केली. त्यापैकी दहा हजार रुपये सोमवारी घेतले. संबंधित तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधला. त्यानुसार पथकाने रात्री शाहूपुरी पोलीस ठाण्यात सापळा रचला. त्यावेळी पाच हजार रुपयांची लाच स्वीकारताना पोलीस शिपाई सागर कोळी हा जाळ्यात अडकला.
रात्री दक्षता अन् मध्यरात्री गाफीलता
सागर कोळी याची ड्युटी मंगळवारी रात्री नऊ वाजता सुरू झाली. त्यावेळी तक्रारदार लाचेची रक्कम देण्यासाठी पोलीस ठाण्यात आला; पण तेथे गर्दी असल्याने त्याला मध्यरात्री बारा वाजता रक्कम घेऊन येण्यास सांगितले. त्यानुसार तक्रारदार हे मध्यरात्री साडेबारा वाजता लाच देण्यासाठी पुन्हा आले. त्यावेळी लाच स्वीकारताना सागर कोळीला पकडले.
संशयितांची घरझडती
दरम्यान, बुधवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक आदिनाथ बुधवंत यांनी पथकासह लाचखोर पोलीस सागर कोळी याच्या उचगावमधील भाड्याच्या घराची झ़डती घेतली. पण त्याठिकाणी काही आक्षेपार्ह मिळाले नसल्याचे समजते.