'स्टेट्स'वरील दागिन्यांचे छायाचित्र पाहून आखली चोरीची योजना; लालसेपोटी निष्पाप भाऊ-बहिणीचा घेतला जीव
By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2020 02:05 PM2020-06-12T14:05:34+5:302020-06-12T14:07:09+5:30
सातारा परिसरातील किरकोनबेननगरातील बहीण-भावाचे हत्याकांडात नात्यातीलच दोन मारेकरी अटकेत
औरंगाबाद : सातारा परिसरातील किनकोरबेननगरातील किरण आणि सौरभ खंदाडे-राजपूत या बहीण-भावाची हत्या त्यांचा चुलत भाऊ आणि अन्य एका नातेवाईकाने केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. अनिता खंदाडे-राजपूत यांनी दीपावलीला लक्ष्मीपूजन करताना सोन्याचे दागिने मांडले होते. या दागिन्यांचे छायाचित्र त्यांनी त्यांच्या व्हॉटस्अॅॅपच्या स्टेटसमध्ये ठेवले होते. ते पाहून आरोपीने अनिता यांच्या घरातील दागिने चोरी करण्याचे ठरवले होते, असे त्याने पोलिसांना सांगितल्याची माहिती सूत्रांनी दिली. किलोभर सोन्याचे छायाचित्र समाजमाध्यमावर ठेवल्याने अनिता यांच्याकडे मोठे दागिने असल्याचे आरोपींना समजले आणि सोन्याच्या लालसेपोटी त्यांनी निष्पाप बहीण-भावाचा बळी घेतल्याचे उघडकीस आले आहे.
सतीश काळूराम खंदाडे-राजपूत (२०, रा. पाचन वडगाव, जि.जालना) आणि अर्जुन देवचंद राजपूत (२५, रा. रोटेगाव रोड, वैजापूर), अशी अटकेतील मारेकऱ्यांची नावे आहेत. आरोपी सतीश हा मयत किरण आणि सौरभचा चुलत भाऊ आहे, तर आरोपी अर्जुन हा सतीशचा मेव्हणा आहे. एक किलो सोन्याची चोरी करण्यासाठी त्यांनी दोघांना ठार केल्याची कबुली पोलिसांसमोर दिली. गुन्हे शाखेने दोन्ही मारेकऱ्यांना बेड्या ठोकल्या आहेत, अशी माहिती पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली.
सातारा परिसरातील किनकोरबेननगर येथील रहिवासी किरण लालचंद खंदाडे-राजपूत (१७), सौरभ लालचंद खंदाडे- राजपूत (१९) यांची त्यांच्या निवासस्थानी गळा चिरून निर्घृण हत्या करून मारेकऱ्यांनी घरातून किलोभर सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना ९ जून रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास उघडकीस आली होती. घटनेच्या दिवशी मयताची आई अनिता आणि मोठी बहीण सपना हे पाचनवडगाव येथे गेले होते. माय-लेकी गावाहून औरंगाबादला घरी परतल्यानंतर ही घटना समोर आली होती. याविषयी सातारा ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे सहायक निरीक्षक गौतम वावळे यांचे पथक तपास करीत असताना परिसरातील एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात सौरभ आणि सतीश दुचाकीवर जाताना कैद झाले होते.
यामुळे पोलिसांनी काढलेल्या माहितीच्या आधारे सतीश आणि त्याचा मेव्हणा घटनेच्या दिवशी किनकोरबेननगरातील खंदाडे यांच्या घरी आले होते, असे समजले. संशय बळावल्याने त्यांचा शोध घेतला असता ते औरंगाबादेतील मुकुंदवाडी परिसरात पोलिसांच्या हाती लागले. त्यावेळी त्यांच्याजवळ चोरीचे सोन्याचे दागिने आढळले. त्यांना गुन्हे शाखेत नेऊन चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली देत दागिने चोरण्यासाठी किरण आणि सौरभची हत्या केल्याचे सांगितले. अनिता खंदाडे यांच्याजवळ अनेक सोन्याचे दागिने असल्याची सतीश खंदाडे याला माहिती होती. त्यातूनच त्याने चोरी करण्याचे ठरविले.
अशी केली क्रूरपणे हत्या
- अनिता आणि सपना या माय-लेकी ९ जून रोजी सकाळी १० वाजता गावी आल्याचे सतीशला दिसले. यानंतर तो आणि त्याचा मेव्हणा अर्जुन दुचाकीने जालना येथे गेले. तेथे त्यांनी दोन धारदार चाकू विकत घेतले. दोघे दुचाकीने जालना येथून औरंगाबादेतील किनकोरबेननगरात दुपारी १२ वाजता आले. बंगल्यात असलेले किरण आणि सौरभ हे त्यांना ओळखत होते. यामुळे त्यांनी सतीश आणि अर्जुनला घरात घेतले.
- आरोपींनी अतिशय क्रूरपणे बहीण-भावाची गळा चिरून हत्या केल्याचे समोर आले. सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास फ्रेश होण्याचा बहाणा करून सतीश बाथरूममध्ये गेला. त्याने आवाज देऊन सौरभला बाथरूममध्ये बोलावून घेतले. साबण चेहऱ्यावर लावल्यामुळे अॅलर्जी होते, चांगली साबण कोणती, असे त्याने सौरभला विचारले. त्याचवेळी अर्जुनने मागून सौरभच्या गळ्यावर चाकूने वार केले. यामुळे सौरभ ओरडताच सतीशने त्याच्या नाकावर ठोसा मारला. यामुळे सौरभ बेशुद्ध होऊन खाली पडला. त्यानंतर अर्जुनने त्याचा गळा आणखी कापला.
- सौरभच्या ओरडण्याच्या आवाजाने खाली आलेल्या किरणने काय झाले, असे सतीशला विचारले असता त्याने काही नाही, असे म्हणून तिचे केस पकडून बाथरूममध्ये ओढत नेले आणि त्याने किरणला खाली पाडून तिचाही निर्घृणपणे गळा कापून ठार केले. त्यानंतर घरातील दागिन्यांची पिशवी घेऊन आरोपी तेथून पसार झाले.
यांनी केला तपास
पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद, उपायुक्त मीना मकवाना, उपायुक्त डॉ. राहुल खाडे, गुन्हे शाखेचे सहायक आयुक्त डॉ. नागनाथ कोडे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक अनिल गायकवाड, सायबर ठाण्याच्या निरीक्षक गीता बागवडे, सुरेंद्र माळाळे, सहायक निरीक्षक गौतम वावळे, कर्मचारी नजीर शेख, सतीश जाधव, चंद्रकांत गवळी, सुधाकर राठोड, सुधाकर मिसाळ, रवी खरात आणि नितीन देशमुख यांनी शास्त्रशुद्ध तपास करून बुधवारी रात्री सतीश आणि अर्जुनला बेड्या ठोकल्या.
सातारावासीयांनी मानले पोलीस आयुक्तांचे आभार
किरकोनबेननगर येथील बहीण-भावाच्या निर्घृण हत्येप्रकरणी जलद गतीने तपास करून मारेकऱ्यांना तात्काळ अटक करण्यात आल्याबद्दल सातारावासीयांनी पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांच्यासह अधिकारी व कर्मचाऱ्यांचे आभार मानले आहेत.