नागपुरात मुलगा बनून हडपला विधवा महिलेचा प्लॉट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2020 10:06 PM2020-01-01T22:06:39+5:302020-01-01T22:07:19+5:30
प्रॉपर्टी डीलरने बनावट कागदपत्रांच्या मदतीने विधवा महिलेचा प्लॉट विकून तिची फसवणूक केली आहे. वाठोडा पोलिसांनी प्रॉपर्टी डीलर आणि त्याच्या तीन साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल केलाआहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : प्रॉपर्टी डीलरने बनावट कागदपत्रांच्या मदतीने विधवा महिलेचा प्लॉट विकून तिची फसवणूक केली आहे. वाठोडा पोलिसांनी प्रॉपर्टी डीलर आणि त्याच्या तीन साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल केलाआहे.
फसवणुकीचा मुख्य सूत्रधार भीमराव सागर वागदे (३४) रा. रुही पांजरा, वर्धा मार्ग हा आहे. वागदेने अशोक वंजारी, चंदननगर, विकास जेम्स चौरे, इंदिरानगर इमामवाडा आणि एका साथीदाराच्या मदतीने महिलेचा प्लॉट विकला. ७५ वर्षाच्या भावना सुधाकर कुळकर्णी यांच्या पतीचा मृत्यू झाला आहे. ती पुण्यात राहते. त्यांचा पुतण्या नागपुरात राहतो. भावनाचा वाठोडाच्या आराधना नगरात प्लॉट आहे. त्यांचा कुणीच वारसदार नसल्यामुळे हा प्लॉट कुणाच्याच नावे केला नव्हता. भावनाचा पुतण्या वकील आहे. वर्षभरापूर्वी भावना पुतण्याला भेटण्यासाठी नागपुरात आल्या. त्यांनी पुतण्याला आराधना नगरात प्लॉट असून तेथे चलण्यास सांगितले. तेथे पोहोचल्यावर भावनाला प्लॉटच्या ठिकाणी घर बांधलेले दिसले. त्यांना धक्का बसला. प्लॉटवर संदीप मोहाडीकर या व्यक्तीने घर बांधले होते. मोहाडीकरची चौकशी केली असता त्याने प्लॉट कथित राजेश सुधाकर कुळकर्णीकडून २१.७५ लाखात खरेदी केल्याचे सांगितले. भावनाने नंदनवन पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. नंदनवन पोलिसांनी बराच काळ तपास प्रलंबित ठेवला. दरम्यान वाठोडा ठाणे सुरु झाल्यामुळे हा गुन्हा तेथे वर्ग करण्यात आला. उपनिरीक्षक अर्चना वाघमारे, हवालदार अरुण बांते यांनी या प्रकरणाचा तपास केला. तपासात वागदे आणि त्याच्या साथीदारांची खरी हकीकत समोर आली. वागदे प्रॉपर्टी डीलर आहे. त्याने योजना आखून या प्लॉटची विक्री केली. तो बऱ्याच काळापासून रिकाम्या प्लॉटचा शोध घेत होता. शासकीय कार्यालयातून त्याच्या मालकाची माहिती गोळा करतो. प्लॉटचे बनावट कागदपत्र तयार करून तो विकतो. पुण्याला स्थायिक झाल्यामुळे भावना यांचे प्लॉटवर येणे-जाणे नव्हते. याचा फायदा घेऊन वागदेने कथित राजेश सुधाकर कुळकर्णीला भावनाचा मुलगा म्हणून दाखविले आणि प्लॉटची विक्री केली. वागदेचे साथीदार अश्विन वंजारी, विकास चौरे यांनी राजेश कुळकर्णी भावनाचा मुलगा असल्याची पुष्टी करून साक्ष दिली. त्या आधारे वाठोडा पोलिसांनी वागदे आणि त्याच्या साथीदाराविरुद्ध फसवणूकीचा गुन्हा दाखल केला आहे.