PMC Bank Scam : आर्थिक गुन्हे शाखेने महिला ऑडिटरला ठोकल्या बेड्या
By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2019 09:59 PM2019-11-14T21:59:57+5:302019-11-14T22:09:03+5:30
पीएमसी बँक घोटाळ्यात पोलिसांनी केलेल्या कारवाईत आरोपींची संख्या आठवर गेली आहे.
मुंबई - पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी बँक (पीएमसी) घोटाळ्याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने (इओडब्ल्यू) आता आणखी एका ऑडिटरला अटक केली आहे. अनिता किरदत (३५) असं या महिला ऑडिटरचं नाव आहे. अनिता किरदत यांच्या अटकेनंतर पीएमसी बँक घोटाळ्यात पोलिसांनी केलेल्या कारवाईत आरोपींची संख्या आठवर गेली आहे.
पीएमसी बँकेत तब्बल ४,३५५ कोटी रुपयांचा घोटाळा झाला आहे. या प्रकरणी आधी २ ऑडिटर यांना अटक करण्यात आली होती. आर्थिक गुन्हे शाखेने अनिता किरदत यांना मंगळवारी चौकशीसाठी बोलावलं होतं. चौकशी केल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. किरदत यांना न्यायालयाने १८ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पीएमसी बँकेच्या आर्थिक व्यवहारांची प्रत्येक महिन्याला पडताळणी करण्याची महत्वाची जबाबदारी त्यांच्यावर होती. बँक व्यवहारांमधील अनियमिततेकडे दुर्लक्ष केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.
मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने लेखापरीक्षणात निष्काळजीपणा केल्याबद्दल सोमवारी पीएमसी बँकेच्या जयेश शाह आणि केतन लकडावाला या दोन ऑडिटर यांना अटक केली होती. हा घोटाळा झाला त्यावेळी या दोघांनी बँकेचे वैधानिक लेखापरीक्षक म्हणून काम पाहिले होते. बँकेच्या काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केलेला घोटाळा लपवण्यात तेव्हा त्यांचा हात होता असा आरोप पोलिसांनी त्यांच्यावर ठेवला आहे.