9.8 कोटी रुपयांचा डीडी पाहून बँक अधिकारी झाले हैराण; पोलिसही चक्रावले
By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2019 12:46 PM2019-09-16T12:46:26+5:302019-09-16T12:48:24+5:30
डिमांड ड्राफ्ट नेपाळच्या एव्हरेस्ट बँकेने जारी केला होता.
नवी दिल्ली : दिल्लीतील पंजाब नॅशनल बँकेच्या एका शाखेचे अधिकारी 9.8 कोटी रुपयांचा डीडी पाहून हैरान झाले होते. त्यांच्याकडे तीन जण हा ड्राफ्ट घेऊन आले होते. महत्वाचे म्हणजे हा ड्राफ्ट नेपाळमधील एका बँकेचा होता.
डिमांड ड्राफ्ट नेपाळच्या एव्हरेस्ट बँकेने जारी केला होता. ही बँक पंजाब नॅशनल बँकेची सहयोगी बँक आहे. मात्र, पोलिस आणि बँकेच्या चौकशीत समोर आले की ही फसवणूक होती आणि डीडीही बनावट होता.
पोलिसांनी यश सक्सेना (42), देवेंद्र मालवीय (47) आणि राजीव उपाध्याय अशा तीन जणांना अटक केली असून यापैकी दोघेजण अन्य बँकेचे विक्री अधिकारी आहेत. तिघेही भोपाळचे राहणारे आहेत. जोपर्यंत डीडी बनावट आहे हे बँकेला कळणार होते, तोपर्यंत हे आरोपी 9.8 कोटी रुपये काढून पसार होणार होते. मात्र, बँकेच्या अधिकाऱ्यांना संशय आल्याने त्यांचा कट फसला आणि गजाआड जावे लागले.
हे बँकेत काम करणारे अधिकारी ड्राफ्ट क्लिअर करण्यासारखी कामे करत होते. तसेच लोकांना कर्जही मिळवून देत होते. चौकशीमध्ये सक्सेना आणि मालवीय यांनी पोलिसांना सांगितले की, तिसरा आरोपी उपाध्यायला रेस्टॉरंट उघडण्यासाठी कर्ज मिळवून दिले होते. यामुळे तिघे मित्र बनले होते.