जालन्यात पोलिसांची ३० रोडरोमिओंवर कारवाई; ‘लोकमत’च्या स्टींगची पोलिसांकडून गंभीर दखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2018 06:06 PM2018-08-25T18:06:54+5:302018-08-25T18:11:53+5:30
शहरासह जिल्ह्यात रोडरोमिओंकडून मुलींची छेड काढली जात असल्याचे ‘लोकमत’ने केलेल्या स्टींग आॅपरेशनमधून समोर आणले.
जालना : शहरासह जिल्ह्यात रोडरोमिओंकडून मुलींची छेड काढली जात असल्याचे ‘लोकमत’ने केलेल्या स्टींग आॅपरेशनमधून आज समोर आणले होते. याची जालना पोलिसांनी गंभीर दखल घेत रोडरोमिओंविरोधात कारवाईची मोहिम हाती घेतली. पहिल्याच दिवशी तब्बल ३० रोमिओंवर कारवाई केली. पहिल्यांदाच पकडलेल्याने रोमिओंना समज देण्यात आली. परंतु पुन्हा सापडल्यास त्यांच्यावर थेट गुन्हे दाखल केले जाणार आहेत.
जालना शहरात मागील काही महिन्यांपासून शाळा, महाविद्यालय, शिकवणीत जाणाऱ्या मुलींची रोडरोमिओंकडून छेड काढली जात होते. तसेच बसस्थानक, नवीन वसाहत परिसर, मोती बाग परिसर, उड्डाणपूल परिसर आदी भागात मुलींना आधिक त्रास होत होत होता. हाच धागा पकडून ‘लोकमत’ने शनिवारी सर्वत्र फिरून सत्य परिस्थिती जाणून घेतली. हा प्रकार खरा असल्याचे दिसले. त्यानंतर ‘रोमिओंचा कट्टा; मुलींची थट्टा’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित केले. त्यानंतर पोलीस प्रशासन खडबडून जागे झाले आणि शनिवारी सकाळपासून कारवायांची मोहीम हाती घेण्यात आली.
पोलीस अधीक्षक एस.चैतन्य यांच्या मार्गदर्शनाखली अपर पोलीस अधीक्षक समाधान पवार हे आपल्या विशेष पथकांना घेऊन स्वत: रस्त्यावर उतरले. पहिल्याच दिवशी विविध भागात जावून त्यांनी तब्बल ३० रोडरोमिओंवर कारवाई केली. या सर्वांना समज देऊन सोडण्यात आले.
दरम्यान, लोकमतच्या वृत्ताची गंभीर दखल घेत अपर अधीक्षक पवार यांनी स्थानिक गुन्हे शाखा, दरोडा प्रतिबंधक पथक, दामिनी पथक, डीबी पथक यांना कारवाईचे आदेश दिले होते. तसेच सर्व पोलीस ठाणे प्रमुखांनाही कारवाया संदर्भात आदेशित करून रस्त्यावर उतरण्यास सांगितले होते. दिवसभर ही धरपडक सुरूच होती. यामुळे छेड काढणाऱ्यांचे धाबे दणाणले होते.
सोमवारपासून जिल्ह्यात मोहीम
पहिल्या दिवशी जालना शहरात कारवाया करण्यात आल्या. परंतु रोमिओंचा बंदोबस्त करण्यासाठी आता सोमवारपासून जिल्हाभरात मोहीम राबविली जाणार आहे. मुलींनीही न घाबरता या रोमिओंविरोधात तक्रार देण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.
मोहीम गतिमान करणार
३० रोमिओंना ताब्यात घेत समज देऊन सोडले. पुन्हा सापडल्यास थेट गुन्हा दाखल केला जाईल. ही मोहीम अधिक गतीमान करण्यासाठी सर्व ठाणे प्रमुखांना आदेश दिले आहेत. मुलींनीही त्रास होत असेल तक्रारी द्याव्यात, त्यांचे नाव गुपीत ठेवले जाईल. सोमवारपासून जिल्हाभर कारवाया केल्या जातील.
- समाधान पवार, अपर पोलीस अधीक्षक, जालना