पोलीस कर्मचाऱ्यासह पत्नीवर अवैध मालमत्ता गोळा केल्याचा ठपका
By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2019 10:22 PM2019-09-26T22:22:04+5:302019-09-26T22:24:22+5:30
माजी पोलीस कर्मचाऱ्याने २२ लाख, ३२ हजार २९५ रुपये एवढी अवैध मालमत्ता जमा केल्याचे पोलिसांनी सांगितले.
मुंबई -पोलीस दलात नोकरीस असताना अवैध मार्गाने संपत्ती जमा केल्यापकरणी सेवानिवृत्त झाल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) माजी पोलीस कर्मचाऱ्यासह त्याच्या पत्नीवर गुन्हा दाखल केला आहे. या माजी पोलीस कर्मचाऱ्याने २२ लाख, ३२ हजार २९५ रुपये एवढी अवैध मालमत्ता जमा केल्याचे पोलिसांनी सांगितले.
वेळोवेळी लाच घेण्यास पत्नीने पतीवर दबाव टाकत बऱ्यापैकी संपत्ती तिच्या नावावर केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. रमेश किसन आवटे (४०), दिपाली रमेश आवटे (३३) अशी या दोघांची नावे आहेत. रमेश आवटे हा पोलीस दलात भरती झाल्यानंतर त्याने अनेक विभागात काम केले होते. यावेळी त्याने बऱ्यापैकी अवैध मालमत्ता जमा केली. तसेच यासाठी त्याला पत्नी देखील मदत करत होती. त्यातच त्याच्यावर अनेक आरोप झाल्यानंतर त्याची बदली शस्त्रास्त्र विभागात करण्यात आली होती. यापकरणाचा तपास सुरु असतानाच त्याला पोलीस दलातुन निलंबित केले. मात्र तपासाअंती आवटे याने अवैध मालमत्ता जमा करीत, ती बऱ्यापैकी पत्नीच्या नावावर केल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार, पोलिसांनी पती-पत्नीवर गुन्हा दाखल करीत, याचा अधिक तपास करण्यास सुरुवात केली.