बेकायदा गर्भपात करणाऱ्या चौगुले रुग्णालयावर पोलीस आणि वैद्यकीय विभागाचा छापा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2018 06:17 PM2018-09-15T18:17:58+5:302018-09-15T18:20:16+5:30
७ बेकायदा गर्भपात केल्याचे उघड, संशयास्पद कागदपत्रे आणि औषधे जप्त
सांगली - बेकायदा गर्भपाताच्या घटनेने सांगली पुन्हा एकदा हादरली. येथील चौगुले रुग्णालयामध्ये ६ बेकायदा गर्भपात झाल्याचे उघडकीस आले आहेत. पोलीस आणि वैद्यकीय विभागाने रुग्णालयावर धाड टाकून डॉ. रुपाली चौगुले यांना ताब्यात घेतले आहे.
शहरात बेकायदेशीर गर्भपात सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलेला आहे. सांगली महापालिकेच्या आरोग्य विभाग आणि पोलिसांनी मिळून संयुक्तरीत्या चौगुले हॉस्पिटलवर छापा टाकत हा प्रकार उजेडात आणला आहे. गेल्या एक वर्षापासून विनापरवाना गर्भपात करण्यात येत असल्याची माहिती समोर आली आहे. संशयास्पद कागदपत्रे आणि औषधे आढळून आली आहेत. त्याचबरोबर या छाप्यामध्ये अनेक आक्षेपार्ह कागदपत्रे आणि दारूच्या बाटल्या ही यावेळी सापडल्या आहेत. तसेच हॉस्पिटलच्या कागदपत्रांची तपासणी केली असता या ठिकाणी सहा गर्भपात केल्याचे समोर आले आहे. आणखी किती बेकायदा गर्भपात करण्यात आले याचा तपास सुरू आहे. या प्रकरणी डॉक्टरासह तिघा जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तपासणी सुरू झाल्यानंतर हॉस्पिटलकडून काही औषधपत्रे जाळण्यात आली आहेत. यानंतर पोलिसांनी याठिकाणीचे औषधे व रोख रक्कम जप्त केली आहे. तर या हॉस्पिटलमध्ये आणखी बेकायदेशीर गर्भपात केल्याची शक्यता वर्तवली जात असून याबाबत तपास सुरू करण्यात आला आहे. गेल्या वर्षी म्हैसाळ येतील गर्भपातामुळे संपूर्ण महाराष्ट्र आणि कर्नाटक हादरुन गेला होता. पुन्हा एक वर्षा नंतर सांगली मध्ये बेकायदेशीर गर्भपाताचा प्रकार उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे.