ठाणे जिल्ह्यातील बंद गोदामे, कारखान्यांवर आता पोलिसांची नजर
By अजित मांडके | Published: September 21, 2022 05:30 PM2022-09-21T17:30:31+5:302022-09-21T17:31:14+5:30
आठ महिन्यात ४२ गुन्हे उघडकीस, ६२ जणांना अटक
लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: जिल्ह्यात गेल्या काही वर्षांपासून अमली पदार्थांच्या विक्रीविरोधात पोलिसांकडून कठोर कारवाई केली जात आहे. ठाणे आयुक्तालय क्षेत्नात ठाणे पोलिसांच्याअमली पदार्थ विरोधी पथकाने आठ महिन्यात ४२ गुन्हे उघडकीस आणले आहेत. त्यामध्ये ६२ जणांना अटक करण्यात आली असून ५७ लाख ५९ हजार १९२ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. त्यात गांजा, मफेड्रॉन, हिरॉईन, अफिम, गुटखा यांसारख्या अमली पदार्थ आण िबंदी असलेले पदार्थ जप्त केले आहेत. परंतु अमली पदार्थाच्या साठवणुकीसाठी बंद गोदामे आणि कारखान्यांचा वापर केला जात असल्याची माहिती या कारवाईतून पुढे आली आहे. त्यामुळे आता पोलिसांनी बंद गोदामे आणि कारखान्यांवर लक्ष केंद्रीत करण्यास सुरवात केले आहे.
अमली पदार्थांच्या साठवणूकीसाठी बंद गोदामे आणि कारखान्यांचा वापर मोठ्याप्रमाणात होत असल्याचे पोलीस कारवाईंमध्ये समोर आले आहे. त्यामुळे आता पोलिसांनी बंद गोदामे आणि कारखान्यांवर लक्ष केंद्रीत करण्यास सुरूवात केली आहे. त्यांसदर्भाच्या सूचना अपर पोलीस आयुक्त अशोक मोराळे यांनी अधिकारी आण िकर्माचार्यांना दिल्या आहेत. त्यामुळे आता अमली पदार्थांच्या तस्करांवर वचक राहण्याची शक्यता वर्तविली जात आहे. पोलीस प्रशासन किंवा अन्न व औषध प्रशासनाची कारवाई टाळण्यासाठी अनेक तस्कर हे बंद गोदामांमध्ये किंवा बंद पडलेल्या कारखान्यांमध्ये त्यांचा माल साठवणूक करत असल्याचे समोर आले आहे.
अशा प्रकारांवर आळा घालण्यासाठी तसेच अमली पदार्थांच्या कारवाईचा आढावा घेण्यासाठी मंगळवारी सायंकाळी ठाणे पोलीस मुख्यालयात जिल्हास्तरीय अमली पदार्थ विरोधी कार्यकरी समतिीची एक बैठक आयोजित करण्यात आली होती. अपर पोलीस आयुक्त अशोक मोराळे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. या बैठकीत साहाय्यक पोलीस आयुक्त राजकुमार डोंगरे, अन्न व औषध प्रशासनाचे साहाय्यक आयुक्त आर. पी. चौधरी, सीमा शुल्क विभागाचे अधीक्षक लेखा व्यंकटेशन, श्रींरग फाटक, अमली पदार्थ विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय शिंदे उपस्थित होते. यावेळी बंद गोदामांमध्ये आणि कारखान्यांमध्ये साठवून ठेवण्यात येणार्या अमली पदार्थांचा मुद्दा समोर आला. त्यावेळी अशोक मोराळे यांनी बंद पडलेल्या कारखाने आणि गोदामांमध्ये कार्यकारी समितीच्या सदस्यांनी आणि पोलिसांच्या पथकाने तपासणी करावी अशा सूचना केल्या. काही अमली पदार्थ हे ऑनलाईनही विक्री होत आहेत. त्यामुळे डार्कनेटद्वारे आणि टपालाद्वारे येणा:या अमली पदार्थांवर लक्ष ठेवण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या आहेत.