४ नायजेरियन नागरिकांना पोलिसांनी अटक करून केले ड्रग्ज जप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2021 09:17 PM2021-01-10T21:17:38+5:302021-01-10T21:18:05+5:30
Drug case : पोलिसांनी त्यांची चौकशी केली असता त्यांचे दोन साथीदार म्हाडाच्या इमारती मधील एका घरात कोकेनची विक्री करत असल्याचे त्यांनी सांगितले .
मीरारोड - मीरारोड पोलिसांनी चार नायजेरियन नागरिकांना अटक त्याच्याकडून ४ लाख ५० हजार रुपये किंमतीचे एमडी व कोकेन हे अमली पदार्थ जप्त केले आहे.
मीरारोडच्या शांतिपार्क लगतच्या म्हाडा इमारत परिसरात नायजेरियन नागरिक अमली पदार्थांची विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली . त्या नुसार पोलिसांनी शनिवारी रात्री ११ च्या सुमारास परिसरात सापळा रचला. त्यावेळी इमारतीच्या प्रवेशद्वारावर दोन नायजेरियन नागरिक संशयास्पद रित्या दिसताच त्यांना ताब्यात घेतले . त्यांच्या कडे कोकेन अढळून आले. पोलिसांनी त्यांची चौकशी केली असता त्यांचे दोन साथीदार म्हाडाच्या इमारती मधील एका घरात कोकेनची विक्री करत असल्याचे त्यांनी सांगितले .
पोलिसांनी लगेच त्या घरावर छापा टाकला असता तेथून पोलिसांना एमडीचा साठा सापडला. ओनीअँग थॉमस , मोरीबा टोकपा , बेन्सीन थॉमस, न्वीकी लिवीनीस अशी अटक केलेल्या आरोपींची नावे असून त्यांच्याकडून पोलिसांनी एकूण २ लाख १३ हजार रुपये किंमतीचे कोकेन व २ लाख ४० हजार रुपये किंमतीचा एमडी अमलीपदार्थ जप्त करत गुन्हा दाखल केला आहे .