बंदुकीचा धाक दाखवून सराफाला लुटणाऱ्या आरोपीस अटक; लुटीचा सर्व मुद्देमाल जप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2021 08:04 PM2021-03-06T20:04:15+5:302021-03-06T20:17:39+5:30
Crime News : रिक्षा चालकांकडून आरोपी कुठे उतरला याची माहिती मिळाली. त्याआधारे पोलिसांनी त्याला नालासोपारा येथून अटक केली.
मीरारोड - १ मार्च रोजी भाईंदर पूर्वेस बंदुकीचा धाक दाखवून साडे सतरा लाखांना सराफास लुटणाऱ्या दरोडेखोरास नवघर पोलिसांनी शनिवारी नालासोपारा येथून अटक केली आहे. लुटीचा सर्व ऐवज जप्त केला असून आरोपी मूळचा पश्चिम बंगालचा आहे. नवघर मार्गावर कामधेनू इमारतीत एक सराफा दुकान आहे. सोमवार १ मार्च रोजी खरेदीच्या बहाण्याने शिरलेल्या व्यक्तीने स्वतः कडील बंदूक काढून सराफास ठार मारण्याची धमकी देत दुकानातील १ लाख ७० हजार रोख, एक मोबाईल व ४५० ग्रॅम वजनाच्या कच्चा सोन्याच्या ८ लगडी असा एकूण १७ लाख ४९ हजार रूपयांचा ऐवज लुटून नेला होता. सदर घटना सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली होती.
या घटनेने एकच खळबळ उडाली होती. नवघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मिलिंद देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश काळे व भास्कर पुल्ली, उपनिरीक्षक संदीप ओहाळ, भालेराव, वाघ, गिरगावकर, शिंदे, जाधव यांच्या पथकाने या गुन्ह्याचा कसून तपास सुरू केला. तांत्रिक विश्लेषणासह सीसीटीव्हीचे फुटेज पोलिसांना तपासकामी खूपच महत्वाचे ठरले. आरोपीने ५ ते ६ रिक्षा बदलल्याचे आढळून आले.
रिक्षा चालकांकडून आरोपी कुठे उतरला याची माहिती मिळाली. त्याआधारे पोलिसांनी त्याला नालासोपारा येथून अटक केली. अंतरज असे आरोपीचे नाव असून तो पूर्वी भाईंदरच्या जेसलपार्क भागात काम करत असे. त्यामुळे ५ महिन्यापूर्वी तो सदर दुकानात चांदी खरेदी करायला गेला असता त्याला तेथे सोन्याचे दागिने सुद्धा असल्याचे समजले. त्यानुसार त्याने दरोड्याचा कट आखला.
मोबाईल नाही तर नकली बंदूक वापरली
आरोपीने गुन्ह्यात वापरलेली बंदूक नकली असल्याचे समोर आले आहे. तर गुन्हा करताना त्याने स्वतः जवळ मोबाईल ठेवला नाही. कारण गुन्हे मालिका पाहून त्यात मोबाईल लोकेशन वरून पोलीस आरोपींना पकडत असल्याचे त्याला माहिती होते.