चरसची तस्करी करणारा पोलिसांच्या ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2020 01:42 PM2020-09-18T13:42:18+5:302020-09-18T13:42:58+5:30
१५ सप्टेंबर रोजी मुंबई पोलिसांच्या पथकाने भाईंदर पूर्वेला गोपीनाथ मुंडे क्रीडा संकुला जवळ सापळा रचून अविनाश सिंह (२४) व श्रवण गुप्ता (३८) या दोघांना २ किलो चरस सह अटक केली होती
मीरारोड - मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने भाईंदर पूर्वेला सापळा रचून २ किलो चरस सह दोघांना पकडल्या नंतर नवघर पोलीस सक्रिय झाले असून त्या गुन्ह्यातील पाहिजेत आरोपी असलेल्या तस्करास अटक करण्यात आली आहे .
१५ सप्टेंबर रोजी मुंबई पोलिसांच्या पथकाने भाईंदर पूर्वेला गोपीनाथ मुंडे क्रीडा संकुला जवळ सापळा रचून अविनाश सिंह (२४) व श्रवण गुप्ता (३८) या दोघांना २ किलो चरस सह अटक केली होती . हे दोघेही आरोपी नाला सोपारा येथील होते आणि त्यांनी सदर चरस हि भाईंदरच्या बलराम उर्फ बल्ली यादव (३३) याच्या कडून घेतल्याचे सांगितले होते .
या प्रकरणी नवघर पोलिसांनी बल्ली यादव याला गुरुवारी रात्री अटक केली आहे . यादव हा नेपाळ वरून उत्तर प्रदेश - बिहार मार्गे चरस आणत असे व अन्य मागणी धारकांना तो पुरवत असे असे पोलीस सूत्रांनी सांगितले . नवघर पोलीस निरीक्षक संपत पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक रोशन देवरे , सहाय्यक उपनिरीक्षक बाळू राठोड, निलेश शिंदे, नवनाथ माने, सुनील ठाकूर आदींनी तपास करून बल्ली यादवला अटक केली .