नात्याला काळीमा! मुलांची विक्री करणाऱ्या आईबापाला कोठडीची हवा; विकलेल्या मुलाचा शोध सुरु
By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2022 07:43 AM2022-01-23T07:43:32+5:302022-01-23T07:44:48+5:30
पैशांच्या मोहापायी तीन मुलांची विक्री करणाऱ्या आई-वडिलांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : पैशांच्या मोहापायी तीन मुलांची विक्री करणाऱ्या आई-वडिलांना सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणी मुले विकत घेणाऱ्यांवरही गुन्हे दाखल केले आहेत. दोन मुली पोलिसांनी ताब्यात घेतल्या असून विक्री झालेल्या मुलाचा शोध घेतला जात आहे. महिला, बालविकास अधिकारी ठाणे व सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीने नेरुळ पोलिसांनी १९ जानेवारीला मुलांची विक्री करणाऱ्या एस. ए. शेख या महिलेला अटक केली.
शुक्रवारी या महिलेचा पती ए. ए. शेख यालाही अटक केली आहे. दोघांनाही न्यायालयाने सोमवारपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. या दोघांनी स्वत:चा एक मुलगा व दोन मुलींची विक्री केली असल्याचे तपासात निदर्शनास आले आहे. पोलिसांनी एक मुलगी सीबीडी बेलापूर व दुसरी मुलगी मानखुर्द परिसरातून ताब्यात घेतली आहे. या मुलींना विकत घेणाऱ्यांवरही गुन्हा दाखल केला आहे. बेलापूरमधील महिलेने ९० हजार रुपये देऊन मुलगी विकत घेतली होती.
मूल दत्तक घेण्यासाठीची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली नसल्यामुळे संबंधित महिलेवरही कारवाई करण्यात आली आहे. मानखुर्दमध्ये दीड लाख रुपयांना मुलीची विक्री केली होती. सोलापूरमध्ये २ लाख रुपयांना मुलाची विक्री केल्याची माहिती तपासात समोर आली आहे.
संशयित मूळ गुजरातमधील
पोलिसांनी मुलांची विक्री करण्याच्या रॅकेटमध्ये अजून कोणाचा समावेश आहे का, तिसरा मुलगा नक्की कोणाला विकला याची माहिती मिळविण्यास सुरुवात केली आहे. अटक केलेले दोन्ही संशयित आरोपी मूळची गुजरातमधील असून नेरुळ रेल्वे स्टेशन परिसरात वास्तव्य करत होते. या गुन्ह्याचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्याम शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक राजेंद्र घेवडेकर, दिगंबर झांजे, नितेश बिराटी, नाना इंगळे करत आहेत.