पोलिसांनी ब्लँकेटवरून लावला एटीएम फोडणाऱ्या टोळीचा छडा, उत्तर प्रदेशातून आवळल्या मुसक्या
By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2019 03:54 PM2019-12-15T15:54:33+5:302019-12-15T15:56:07+5:30
घटनास्थळावर मिळालेल्या ब्लँकेटवरून पोलिसांनी थेट उत्तर प्रदेशातील गाझियाबाद जिल्ह्यात दुर्गम गावात राहणाऱ्या एटीएम फोडणाऱ्या टोळीचा माग काढला.
- सुरेंद्र राऊत
यवतमाळ - एखाद्या थरारपटाला शोभावा अशा पद्धतीचा तपास यवतमाळ स्थानिक गुन्हे शाखेने पूर्ण केला. घटनास्थळावर मिळालेल्या ब्लँकेटवरून थेट उत्तर प्रदेशातील गाझियाबाद जिल्ह्यात दुर्गम गावात राहणाऱ्या एटीएम फोडणाऱ्या टोळीचा माग काढला. त्यांच्याकडून चोरलेली पाच लाखांची रोख, गुन्ह्यात वापरलेली गाडी, गॅस कटर हे साहित्य जप्त केले. चार राज्याच्या पोलिसांची मदत घेऊन ही कारवाई करण्यात आली.
करंजी रोड येथील स्टेट बँकेचे एटीएम गॅस कटरने कापून त्यातील सात लाखांची रोख चोरीला गेली होती. ही घटना १७ नोव्हेंबरला सकाळी ८ वाजता उघड झाली. या प्रकरणी पांढरकवडा पोलिसांनी अज्ञातांविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला. या गंभीर गुन्ह्याचा तपास पांढरकवडा पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांनी सुरू केला. घटनास्थळाला सर्वच वरिष्ठ पोलीस अधिका+यांनी भेट देऊन पाहणी केली. या ठिकाणी मिळालेल्या ब्लँकेटवरून अज्ञात एटीएम चोरट्यांचा माग पोलिसांनी काढला. मो.साकीर मो.जफर (३२), सरफराज उमर खान (३३) दोघेही रा.भोजपूर जि.गाजियाबाद, उत्तर प्रदेश यांना १३ डिसेंबर रोजी अटक केली. त्यांच्याकडून पाच लाख रुपये रोख, सहा लाख रुपये किमतीची कार, पाच हजारांचे मोबाईल, १५ हजारांचे गॅस कटर असा ११ लाख २० हजारांचा मुद्देमाल जप्त केला.
उत्तर प्रदेशातून रोख रकमेसह आरोपीला आणणे आजपर्यंत शक्य झाले नाही. यवतमाळ पोलिसांनी ही कामगिरी पूर्ण केली. यात अपर अधीक्षक नुरूल हसन यांनी विशेष पुढाकार घेतला. गाजियाबाद येथील पोलीस अधीक्षक निरज त्यांचे बॅचमेंट असल्याने यवतमाळ पोलिसांना गाजियाबादमध्ये भरपूर सहकार्य मिळाले. सलग तीन दिवस पोलीस उपनिरीक्षक मंगेश भोयर, सचिन पवार, मंगेश भोंगाडे सहकाºयांसह गाजियाबादमध्ये ठाण मांडून होते. शिताफीने आरोपींना अटक करून मुद्देमाल जप्त केला. या कारवाईत सहायक फौजदार साहेबराव राठोड, सुधीर पिदूरकर, महेश पांडे, सुरेंद्र वाकोडे, विठ्ठल बुरूजवाडे, सुहास मंदनवार, सचिन मकराम, रितेश श्रीवास, पंकज गिरी, दिगांबर पिलावन यांनी सहभाग घेतला. ही कामगिरी जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राज कुमार, अपर अधीक्षक नुरूल हसन, पांढरकवडा एसडीपीओ अमोल कोळी, एलसीबी प्रमुख प्रदीप शिरस्कर, पांढरकवडा ठाणेदार रामकृष्ण महल्ले यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली.
उमरेडमधून मिळली तपासाला दिशा
गाजियाबाद ग्वाल्हेर मार्गे महाराष्ट्रात आलेल्या या चोरट्यांनी उमरेड (जि.नागपूर) येथे दोन एटीएम फोडण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. नंतर तेथून ब्लँकेट खरेदी केले. हैदराबाद मार्गाने निघाले असता राष्ट्रीय महामार्ग क्र. ७ वर असलेल्या करंजी येथील एटीएम या चोरट्यांनी गॅस कटरने फोडले. हा गुन्हा करण्यापूर्वी त्यांनी डोक्यात माकड टोपी घातली होती. नंतर सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर काळ्या रंगाचा स्प्रे मारला. अंगावर ब्लँकेट ओढून एटीएम फोडले व रोख काढून घेतली. जाताना चोरटे सोबत आणलेले ब्लँकेट नेण्याचे विसरले. येथूनच पोलिसांना सुगावा मिळाला. हे ब्लँकेट उमरेडमधील ज्या दुकानातून खरेदी केले होते त्याचा टॅग लागलेला होता. पोलिसांनी त्या टॅगचा शोध घेऊन उमरेडमधील दुकान गाठले. तेथे ब्लँकेट खरेदी करताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले. गुन्ह्यात वापरलेली गाडीही सीसीटीव्हीत आली. मात्र त्या गाडीचा क्रमांक दिसत नव्हता. चोरट्यांनी बिल बनविताना आपला खराच मोबाईल क्रमांक नमूद केला. या आधारावर पोलिसांच्या चार पथकांनी तपास करत या दोघांना अटक केली.