पँटच्या खिशात स्लिप, त्यात ४ अक्षरे, मैत्रिणीचं कनेक्शन...; मुंबईतल्या फिल्म एजेंट हत्येचं गूढ उकळलं
By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2024 04:45 PM2024-08-08T16:45:31+5:302024-08-08T16:46:04+5:30
नालासोपारा इथं सापडलेल्या बेवारस मृतदेहाची ओळख पटवून पोलिसांनी त्याच्या २ मारेकऱ्यांना जेरबंद केले आहे. या घटनेत पोलिसांकडे पुरावा म्हणून फक्त ४ अक्षरांची स्लिप होती. त्यातून गुन्ह्याचा पर्दाफाश झाला आहे.
मुंबई - कायद्याच्या कचाट्यातून कुणी सहसा सुटत नाही. कितीही मोठा गुन्हा केला, पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला तरीही पोलिसांचा हात आरोपीपर्यंत पोहचतोच. अनेकदा काही घटनांमध्ये पोलिसांकडे काही पुरावा नसतो, त्यामुळे आरोपी वाचणार असं वाटतं. परंतु आरोपीच्या जेरबंद करण्यासाठी एक छोटासा पुरावाही पुरेसा असतो. मुंबईतल्या एका कहाणीत असेच काही घडलं. या कहाणीत पोलिसांकडे पुरावा म्हणून केवळ स्लिप होती ज्यावर केवळ ४ अक्षरे लिहिली होती. मात्र याच चार अक्षरांच्या स्लिप माध्यमातून पोलिसांनी एका मोठा पर्दाफाश केला.
१० मे २०२४ चा दिवस, तेव्हा मुंबईच्या नालासोपारा इथं पोलिसांना एक मृतदेह सापडतो. मुंबई अहमदाबाद नॅशनल हायवेवरील नाल्याजवळ हा मृतदेह सडलेल्या अवस्थेत असतो. ओळख पटवण्यासाठी मृतदेहावर कुठल्याही खूणा नव्हत्या. ना त्याच्याकडे काही सामान होते ज्यामुळे त्याची ओळख पटू शकेल. मृत व्यक्तीचा फोनही गायब होता. पोलिसांनी त्याच्या कपड्यांची तपासणी केली तेव्हा त्याच्या पँटच्या खिशात एक स्लिप सापडली. या स्लिपवर केवळ ESEL ही अक्षरे लिहिली होती. पोलिसांनी एक पथक बनवून या चार अक्षरांमागील रहस्य शोधण्यास सुरुवात केली.
चार अक्षरांनी लागला सुगावा
हा मृतदेह पोस्टमोर्टमला पाठवला, त्या रिपोर्टमधून या व्यक्तीचा मृत्यू डोक्यावर एका मजबूत वस्तूने वार केल्याने झाल्याचं समोर आले. पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली. इंटरनेटवर या स्लिपमधील चार अक्षरांशी मिळतेजुळते दुकान, फर्म आणि कंपन्यांशी निगडीत १५० हून अधिक नंबर मिळाले. पोलिसांनी या नंबरवर कॉल करणं सुरू केले. अखेर पोलिसांना मुंबईच्या मानखुर्द परिसरातील एका स्टुडिओतून मृतदेहाचा सुगावा लागला. हा मृतदेह २७ वर्षीय संतोष यादव नावाच्या व्यक्तीचा होता. जो सिनेमात आऊटडोर शुटींगसाठी ज्यूनिअर आर्टिस्ट देणारा एजेंट म्हणून काम करत होता.
संतोषच्या महिला मैत्रिणीनं सांगितली २ नावे
पोलिसांनी चौकशी केली असता संतोष यादव हा ७ मेपासून बेपत्ता होता. चौकशीत एका महिलेचं नाव पुढे आले. एक एक करून पोलीस साखळी जोडत गेले. जेव्हा पोलीस या महिलेकडे गेले तेव्हा तिने २ नावे सांगितली. ही महिला सिनेमात ज्यूनिअर आर्टिस्ट म्हणून काम करायची आणि संतोषची मैत्रिण होती. या महिलेने संतोषला अखेरचं सनी सुनील सिंह आणि राहुल सोहन पालसोबत पाहिले होते. हे दोघेही सिनेमात एजेंट म्हणून काम करत होते.
संतोषच्या हत्येचा तपास करणाऱ्या पोलीस पथकाने ३ दिवसानंतर ठाण्यातून सनी सुनील सिंहला अटक केली. सनीला खाकीचा धाक दाखवताच त्याने गुन्हा कबूल केला. सनीने मित्र राहुल पालसोबत मिळून संतोष यादवची हत्या केली. संतोष यादवला फिल्म शुटींगसाठी ज्यूनिअर आर्टिस्ट देण्याचं मोठं कंत्राट मिळालं होतं. ते कंत्राट सनी आणि राहुलला हवं होते परंतु जेव्हा कंत्राट संतोषला मिळाले त्यामुळे या दोघांना राग आला. त्याच रागातून दोघांनी संतोषची हत्या केली.
दारूच्या बहाण्याने बोलावलं अन्...
७ मे २०२४ ला सनी आणि राहुलनं दारू पिण्याच्या बहाण्यानं संतोषला नालासोपारा येथील एका निर्जनस्थळी नेले. तिथे संतोषला दारू पाजली आणि जेव्हा तो नशेत धुंद झाला तेव्हा त्याच्या डोक्यावर दगडाने हल्ला करून हत्या केली. त्यानंतर या दोघांनी संतोषचा मृतदेह जवळील नाल्यात फेकला आणि तिथून फरार झाले. सनीनं पोलिसांसमोर गुन्हा उघड करताच त्याचा मित्र दुसरा आरोपी राहुलच्या शोध सुरू झाला. त्यानंतर १ महिन्याने राहुलला हरियाणातील फरिदाबाद येथे जाजरू गावातून अटक केली. या दोघांवर हत्या आणि पुरावे मिटवण्याचा गुन्हा दाखल झाला असून पोलीस कारवाई सुरू आहे.