पत्ता विचारण्याच्या बहाण्याने सोनसाखळी घेऊन पसार व्हायचे; २चोरट्यांना अटक
By सागर दुबे | Published: May 26, 2023 03:01 PM2023-05-26T15:01:09+5:302023-05-26T15:01:18+5:30
रामानंदनगर पोलिसांची कारवाई ; दोन चोरट्यांना अटक, तब्बल १९ गुन्ह्यांची उकल, गेल्या काही दिवसांपासून रामानंदनगर, जिल्हापेठ व एमआयडीसी पोलिस ठाण्यांच्या हद्दीमध्ये सोनसाखळी धूमस्टाईलने खेचून नेण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत होत्या.
जळगाव - पादचारी ज्येष्ठ महिलांना टार्गेट करून पत्ता विचारण्याच्या बहाण्याने महिलांच्या सौभागाच्या लेण्यावर अर्थात सोनसाखळी धूमस्टाईलने खेचून नेण्याच्या घटनांमध्ये गेल्या काही महिन्यांपासून वाढ झाली होती. या सोनसाखळी चोरट्यांच्या रामानंदनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या असून दोन जणांना अटक करण्यात आली आहे. दत्तात्रय अमृत बागुल (३९, रा.मोहननगर, मुळ रा.मोहाडी, जि.धुळे) व सुधारक उर्फ जितेंद्र सुरेश महाजन (२५, रा. रामेश्वर कॉलनी) असे अटक केलेल्या चोरट्यांची नावे असून त्यांनी १९ गुन्ह्यांची कबुली दिली आहे. त्यांच्याकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.
गेल्या काही दिवसांपासून रामानंदनगर, जिल्हापेठ व एमआयडीसी पोलिस ठाण्यांच्या हद्दीमध्ये सोनसाखळी धूमस्टाईलने खेचून नेण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत होत्या. काही दिवसांपूर्वी नुतन वर्षा कॉलनीमध्ये ७० वर्षीय वृध्द महिलेची सोनसाखळी लांबवून पळणा-या दत्तात्रय बागूल याला रामानंदनगर पोलिसांनी पकडले होते. नंतर त्याची कसून चौकशी केल्यावर त्याने १९ सोनसाखळी चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली. तर गुन्ह्यांमध्ये त्याचा साथीदार सुधाकर महाजन हा सुध्दा असल्याची माहिती त्याने पोलिसांना दिली. पोलिसांनी तत्काळ महाजन याला सुध्दा रामेश्वर कॉलनीमधून अटक केली.
२०१८ पासून करत होते चोरी...
दत्तात्रय आणि सुधाकर हे शहरातील एका कंपनीमध्ये मजुर म्हणून कामाला होते. पण, मौजमजेसाठी त्यांनी चोरीचा मार्ग निवडला. सन २०१८ ते २०२३ मे पर्यंत त्यांनी रामानंदनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत १४ तर जिल्हापेठच्या हद्दीत ०२ आणि एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत ०२ असे एकूण १९ सोनसाखळी चोरीचे गुन्हे केले आहेत. त्यापैकी १४ गुन्ह्यांची त्यांनी कबुली दिली आहे.
२६ तोळे सोने, दुचाकी जप्त...
दरम्यान, रामानंदनगर पोलिसांनी दोघांकडून २६ तोळे सोने जप्त केले आहे. त्यामध्ये सोनसाखळ्यांचा समावेश आहे. तसेच गुन्ह्यांमध्ये वापरलेली दुचाकी सुध्दा रामानंदनगर पोलिसांनी जप्त केली आहे. दोघांची कसून चौकशी केली जात असून त्यांच्याकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. त्यांना पुढे जिल्हापेठ व एमआयडीसी पोलिस चौकशीसाठी ताब्यात घेणार आहेत.
म्हणून लागत नव्हते हाती...
जिल्ह्यातील पोलिस दप्तरी या चोरट्यांचा कुठलाही रेकॉर्ड नव्हता. त्यामुळे हे चोरटे पोलिसांच्या हाती लागण्यात अडचणी येत होत्या. दरम्यान, काही सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागले होते. त्या आधारावर चोरट्यांचा शोध सुरू होता.
यांनी केली कारवाई
पोलिस अधीक्षक एम.राजकुमार, अपर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी, रामानंदनगर पोलिस निरीक्षक शिल्पा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक रोहिदास गभाले, संजय सपकाळे, सुशिल चौधरी, रेवानंद साळूंखे, रवींद्र चौधरी, विजय खैरे, प्रविण वाघ, राजेश चव्हाण, अतुल चौधरी, उमेश पवार, अनिल सोननी, दीपक वंजारी आदींच्या पथकाने ही कारवाई केली आहे.
कशी होती चोरीची पद्धत?
दोन्ही चोरटे कधी-कधी शुकशुकाट असलेल्या रस्त्यावरून जाणा-या महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी मोटारसायकलवरून येवून खेचून घेवून जात होते. तर कधी-कधी एक जण महिलांचा पाठलाग करायचा तर दुसरा दुचाकीवर एका ठिकाणी थांबून रहायचा. पाठलाग करणा-याने महिलेची पोत ओढली की तो साथीदाराच्या दिशेने पळ काढायचा. नंतर दोघे दुचाकीवरून पसार व्हायचे.
सोनसाखळी चोरीच्या घटना टाळण्यासाठी हे करा
- महिलांनी घरा बाहेर फिरताना आपले दागिने संभाळावेत.
- महिला व जेष्ठ नागरिकांनी मॉर्निंग वॉकला जाताना सोन्याचे दागिने घालणे व एकटयाने जाणे टाळावे.
- विरुद्ध दिशेने येणारे, हेल्मेट घातलेले, चेहरा रूमालाने झाकलेले, मोटार सायकलस्वार हे साखळी चोर असू शकतात.
- विना नंबर प्लेटची मोटार सायकल चालविणारा किंवा निर्जण ठिकाणी विनाकारण रेंगाळणारा इसम हा संशयित चोर असू शकतो.
- चालताना फुटपाथचा वापर करा, जेणेकरुन दुचाकीस्वारास दागिने हिसकाविण्यासाठी आपल्यापर्यंत पोहचता येणार नाही.
- रस्त्यावरुन चालताना आपल्या पत्नीस डाव्या बाजूस ठेवा व स्वतः उजवीकडून चालावे.
- अनुचित घटना घडल्यास तात्काळ पोलीस स्टेशन अथवा डाइल ११२ नंबरला कळवा.
- कोणतेही दुचाकी वाहन जर पुन्हा पुन्हा मागे येत असेल तर त्या वाहनाचा क्रमांक लिहून घ्या व सतर्क व्हा, पोलीसांना कळवा.
- वयस्कर इसम अगर वृध्द महिला जात असताना आम्ही पोलीस आहोत, पुढे मोठा अपघात अथवा खुन झाला आहे अशी खोटी माहिती सांगून पोलीस तपासणी चालू असल्याने तुमचे दागिने काढुन पिशवीत अथवा रूमालात ठेवा असे सांगतात व पुढे हातचालाखीने ते दागिने लंपास करतात. असे इसम प्रसंगी पोलीस असल्याचे बनावट / खोटे ओळखपत्र दाखवितात असे संशयित इसम आढळल्यास आरडाओरडा करुन आजुबाजुच्या लोकांना बोलवा.
- खरे पोलीस केव्हाही दागिने काढुन ठेवण्याबाबत सांगत नाहीत, हे नेहमी लक्षात ठेवा