पाचशे रुपयांची लाच स्विकारताना पोलीस सापडला पोलिसांच्या जाळ्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2019 10:07 PM2019-07-03T22:07:14+5:302019-07-03T22:08:35+5:30
ही कारवाई आज गोंदिया ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत करण्यात आली.
गोंदिया - राज्य राखीव पोलीस गट क्रमांक १ पुणे येथील शिपायाला ५०० रुपयांची लाच मागणाऱ्या सहाय्यक फौजदाराला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहात पकडले. ही कारवाई आज (दि.३) गोंदिया ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत करण्यात आली. प्रभाकर अनंत अंडागडे असे पाचशे रुपयांची लाच स्विकारणाऱ्या सहाय्यक फौजदाराचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार पुणे येथील राज्य राखीव दल गट क्रमांक १ ची तुकडी गोंदियाच्या नक्षलग्रस्त भागात आली. २२ जून रोजी ते पोलीस मुख्यालय गोंदिया येथे हजर झाले. नक्षलग्रस्त भागात कर्तव्यावर जाण्यापूर्वी त्यांचे कमांडो प्रशिक्षण पोलीस मुख्यालय गोंदिया येथे सुरु आहे. प्रशिक्षणा दरम्यान सहाय्यक फौजदार पी.ए.अंडागडे याने २७ जून रोजी कंपनीच्या ४० कर्मचाऱ्यांनी सांगितले की, गोंदिया जिल्ह्यात आपली ड्युटी लागल्यामुळे वेतनामध्ये प्रोत्साहन भत्याचा फायदा होतो आणि सुट्टीवर येणे-जाणे सोईस्कर होते. त्यामुळे विकास पाटील यांनी प्रयत्न करुन आपल्या कंपनीची ड्युटी गोंदिया जिल्ह्यात लावून घेतली असे सांगितले. त्यामुळे आपल्या कंपनीच्या कर्मचाऱ्याकडून २० हजार रुपये गोळा करुन तत्कालीन पोलीस निरीक्षक विकास पाटील यांना पाठवायचे आहेत असे सांगून प्रत्येकाकडून ५०० रुपयांची लाच मागण्यात आली. परंतु एका शिपायाला ते ५०० रुपये देण्याची मुळीच इच्छा नसल्यामुळे त्याने २९ जून रोजी पी.ए.अंडागडे यांच्याविरुद्ध तक्रार केली. यासंदर्भात ३ जुलै रोजी सापळा रचून गोंदिया ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत सहाय्यक फौजदाराला अटक करण्यात आली. सदर कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे,राजेश दुदलवार यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपअधीक्षक रमाकांत कोकाटे,पोलीस निरीक्षक शशीकांत पाटील, हवालदार प्रदीप तुळसकर,राजेश शेंद्रे, नायक पोलीस शिपाई रंजीत बिसेन, दिगंबर जाधव, नितीन रहांगडाले, राजेंद्र बिसेन, वंदना बिसेन, गीता खोब्रागडे, देवानंद मारबते यांनी केली.