वीस हजारांची लाच स्वीकारणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यास अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2019 12:21 PM2019-05-11T12:21:44+5:302019-05-11T17:10:36+5:30
तक्रारदार हा अनाधिकृतरीत्या सिगारेट बॉक्स विकतो, असा संशय व्यक्त करुन त्याला कारवाई करण्याची भीती घालून सुरुवातीला आरोपीकडून ५० हजार रुपयांची मागणी करण्यात आली.
पुणे : अनधिकृत सिगारेट बॉक्स खरेदी केल्याचा संशय घेत त्यावरुन कारवाईची भीती घालणाऱ्या एका पोलीस कर्मचाऱ्यास वीस हजारांची लाच घेताना अटक केली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी चतुश्रृंगी पोलीस ठाण्यात पोलीस नाईक म्हणून काम पाहणा-या संजय भिला वाघ (वय ३८) असे कारवाई करण्यात आलेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे.
तक्रारदार हा अनाधिकृतरीत्या सिगारेट बॉक्स विकतो, असा संशय व्यक्त करुन त्याला कारवाई करण्याची भीती घालून सुरुवातीला आरोपीकडून ५० हजार रुपयांची मागणी करण्यात आली. तडजोडीनंतर ती रक्कम २० हजार घेण्याचे ठरले. लाचलुचपत प्रतिबंधकच्या अधिका-यांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी शुक्रवारी मुंबई पुणे हायवेसमोरील एका हॉटेलसमोर सापळा रचून त्याला पकडले. सापळा पथकात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक राजु चव्हाण, पोलीस निरीक्षक सुरेखा घार्गे, पोलीस हवालदार सुनील शेळ्के, पोलीस नाईक श्रीकृष्ण कुंभार, विनोद झगडे यांचा समावेश होता.
कारवाई होऊ नये म्हणून घेतली २२०० रुपयांची लाच
वाहन चालविण्याच्या परवान्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई करु नये याकरिता २२०० रुपयांची लाच स्वीकारणा-या पौड येथील पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक योगेश सवाणे याला देखील लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने सापळा रचून पकडले. तक्रारदाराला आपल्या गाडीत बोलावून त्याच्याकडे लाचेची मागणी केली. मात्र कारवाईची चाहुल लागताच आरोपीने धोकादायक व बेदरकारपणे वाहन चालवत पळ काढला. पोलीस निरीक्षक चंद्रकांत चौधरी, पोलीस शिपाई किरण चिमटे, पोलीस हवालदार गायकवाड, नवनाथ माळी आदी कारवाईत सहभागी होते.