१०० हुन अधिक गुन्हे केलेला फरार आरोपी १५ वर्षांनी लागला पोलिसांच्या हाती
By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2019 08:29 PM2019-04-11T20:29:02+5:302019-04-11T20:33:16+5:30
ओळख लपवून बसलेल्या संतोष गोपाळ नायरला पुण्यातून सापळा रचून पोलिसांनी अटक केली.
मुंबई - २००४ साली दहिसर पोलीस ठाण्याच्या हद्दीत डायमंड कारखान्यात दरोडा घालण्यासाठी आलेल्या ४ आरोपींना गुन्हे शाखेच्या कक्ष १२ ने शिताफीने सापळा लावून आरोपींना पकडले होते. त्यावेळी एक चिनी बनावटीचे विदेशी पिस्तूल, चार जिवंत कडसुते, २ चॉपर आणि चोरीची पांढऱ्या रंगाची इस्टिम कार हस्तगत करण्यात आली होती. दरम्यान घटनास्थळाहून कुख्यात दरोडेखोर आणि त्याचे साथीदार नधाराचा फायदा घेऊन पळून गेले होते. संबंधित दरोडेखोर हा फरार होता. हा दरोडेखोर पुण्यात असल्याची माहित कक्ष १२ ला मिळाली होती. त्यानुसार ओळख लपवून बसलेल्या संतोष गोपाळ नायरला पुण्यातून सापळा रचून पोलिसांनीअटक केली.
जवळजवळ १५ वर्षांपासून फरार दरोडेखोर संतोष पुण्यात स्वतःची ओळख लपवून राहत असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली होती. या गोपनीय माहितीच्या आधारे नेमक्या ठावठिकाणाची माहिती प्राप्त करून पळत पोलिसांनी ठेवली होती. नंतर माहिती काढून पोलिसांना सापळा रचून शिताफीने संतोष नायरला अटक केले. संतोषविरोधात मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईत दरोडा, जबरी चोरी, दरोड्याचा प्रयत्न, घरफोडीसारख्या १०० हुन अधिक गुन्हे दाखल आहेत.