कुत्र्याच्या भांडणातून युवकाचा गेला जीव, पोलिसांनी केली आरोपीला अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2020 05:11 PM2020-12-23T17:11:25+5:302020-12-23T17:12:13+5:30
Murder : जखमी युवकाचा सावंगी मेघे येथील रुग्णालयात बुधवारी मृत्यू झाला. या प्रकरणी आरोपीला ग्रामीण पोलिसांनी अटक केली.
यवतमाळ : दोन शेजाऱ्याच्या कुत्र्यांमध्ये भांडण झाले. या वादात शेजारी राहणाऱ्या युवकाचा चक्क विटा व दगडाने मारहाण करून खून करण्यात आला. ही घटना १६ डिसेंबरच्या रात्री माळम्हसोला येथे घडली. यातील जखमी युवकाचा सावंगी मेघे येथील रुग्णालयात बुधवारी मृत्यू झाला. या प्रकरणी आरोपीला ग्रामीण पोलिसांनी अटक केली.
माळम्हसोला गावात शेजारी राहणाऱ्या हागवणे व चव्हाण या दोन कुटुंबांनी कुत्रा पाळला आहे. १६ डिसेंबरच्या रात्री या दोन कुत्र्यात भांडण सुरू झाले. हे भांडण सोडविण्यासाठी रोहित रामचंद्र हागवणे (१८) याने शेजारी असलेल्या रमेश बबलूसिंग चव्हाण याला त्याचा कुत्रा घरात नेण्यास सांगितले. यातून रमेशने रोहितला शिवीगाळ केली. दोघांमध्ये शब्दावरून शब्द वाढत गेले. संतापलेल्या रमेशने रोहितला जवळच पडून असलेल्या विटीने मारहाण सुरू केली. रोहितला जमिनीवर पाडून अक्षरश: जीवघेणी मारहाण करण्यात आली. आरडाओरडा ऐकून गावकरी धावून आले. त्यांनी रमेशच्या तावडीतून रोहितची कशीबशी सुटका केली. गंभीर जखमी रमेशला यवतमाळ शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे त्याची प्रकृती आणखीच खालावल्याने डॉक्टरांनी नागपूरला जाण्याचा सल्ला दिला. सावंगी मेघे येथे रोहितचा उपचारादरम्यान बुधवारी मृत्यू झाला. सुरुवातीला ग्रामीण पोलिसांनी या प्रकरणात खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला होता. आता हा गुन्हा खुनाच्या गुन्ह्यात वर्ग करण्यात आला आहे. आरोपी रमेश बबलूसिंग चव्हाण याने क्षुल्लक कारणावरून शेजारी राहणाऱ्या युवकाचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या घटनेने गावात हळहळ व्यक्त होत आहे.