भाजपच्या स्थानिक नेत्यासह वकिलास १० लाखांची खंडणी घेतल्या प्रकरणी अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 09:17 PM2021-05-29T21:17:20+5:302021-05-29T21:17:57+5:30
भाजपाचा स्थानिक नेता सय्यद मुनावर हुसेन व वकील योगेश सदाशिव जगदाळे ह्या दोघांना १० लाखांची खंडणी घेतल्याप्रकरणी पोलिसांनी अटक केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
मीरारोड: मीरारोड येथील भाजपाचा स्थानिक नेता असलेल्या सय्यद मुनावर हुसेन सह वकील योगेश सदाशिव जगदाळे ह्या दोघांना १० लाखांची खंडणी घेतल्या प्रकरणी नया नगर पोलिसांनी शनिवारी अटक केली आहे. मुनावर बलात्काराचा गुन्हा दाखल करणाऱ्या पीडितेने तुझ्या सांगण्यावरून तक्रार केल्याचे प्रतिज्ञापत्र दिले असून न्यायालयात दावा करू अन्यथा खंडणी दे अशी धमकी फिर्यादीला ह्या जगदाळे व मुनावरने दिली होती .
मीरारोडच्या नया नगर भागातील मुनावर हुसेन ह्याला त्याचे वडिलांनी अनेक वर्षांपूर्वी कुटुंबातून बेदखल केले. काँग्रेसचे माजी आमदार मुझफ्फर हुसेन यांचा तो भाऊ असून २०१९ च्या विधानसभा निवडणुकी वेळी भाजपाचे तत्कालीन उमेदवार नरेंद्र मेहतांच्या हस्ते भाजपात प्रवेश केला होता.
सप्टेंबर २०२० मध्ये मुनावर विरोधात काशीमीरा पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. मुनावर ह्याने लग्नाचे आमिष दाखवून अनेक वर्ष बलात्कार केला, मारहाण केली, अशी तक्रार ३३ वर्षीय पीडितेने केली होती. त्या पीडितेने मुलांवर विरुद्ध केलेली फिर्याद हि तुझ्या सांगण्यावरून केल्याचे प्रतिज्ञापत्र दिल्याने उच्च न्यायालयात याचिका करणार, असे वकील योगेश जगदाळे रा . मीरा सोसायटी, अमर पॅलेस जवळ , मीरा गाव ह्याने आदिल वसीफ खान रा . अलफतेह, मीरारोड ह्याला धमकावले .
आपली न्यायालयात आणि पोलिसांशी ओळख असून मी स्वतः कोर्ट कमिशन असल्याने सनदी अधिकाऱ्यासारखे तपास करण्याचे अधिकार असल्याचे धमकावून ५५ लाखांची खंडणी मागितली. शिवाय एका साक्षीदाराच्या व्हॉट्स एपवर गुंडांचे फोटो पाठवून जीवे मारायची धमकी आदिलला दिली. तडजोडी नंतर २० लाखांची खंडणी ठरली. आदिल ह्याने या प्रकरणी पोलिसात तक्रार केली. तर शुक्रवारी रात्री शांतिपार्क मधील श्रद्धा इमारतीत १० लाखांचा पहिला हप्ता घेतला. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून शनिवारी सकाळी वकील जगदाळे आणि मुनावर ह्यास अटक केली आहे.