पोलिसांची मोटारसायकल फरफटत नेऊन पसार झालेल्या गांजा तस्कराला अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2021 10:15 PM2021-10-14T22:15:00+5:302021-10-14T22:15:23+5:30
Crime News : वर्तकनगर पोलिसांची कामगिरी: तीन लाख ९६ हजारांचा गांजा जप्त
ठाणे: नाकाबंदीच्या वेळी पोलिसांच्या मोटारसायकलीला धडक देऊन पसार झालेल्या करमजीत रवी आनंद (२५, रा. अंधेरी, मुंबई) या गांजा तस्कराला ठाण्याच्या वर्तकनगर पोलिसांनी बुधवारी अटक केली. त्याच्याकडून तीन लाख ९६ हजारांचा पाच किलो ४८१ ग्रॅम गांजा जप्त केला आहे.
वर्तकनगर पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार ज्योतिराम मोरकाणे हे १३ ऑक्टोंबर २०२१ रोजी सकाळी ८.१५ वाजण्याच्या सुमारास नाकाबंदी तपासणी करीत होते. त्याचवेळी विवियाना मॉलसमोरील सेवा रस्त्याने एक संशयित कार जातांना त्यांना दिसली. त्यांनी या कारला थांबण्याचा इशारा करुन मोटारसायकल कारच्या समोर उभी केली. तसेच मोटारसायकलवरुन उतरुन मोटारीच्या बाजूने यातील चालकाकडे चौकशी केली. तेंव्हा त्याने समोरील मोरकाणे यांच्या मोटारसायकलला धडक देऊन ती काही अंतर फरफटत नेली. नंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक सदाशिव निकम यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक संतोष घाटेकर, सहायक पोलीस निरीक्षक होळकर यांच्या पथकाने चितळसर भागातून या मोटारकारसह करमजीत याला साई गॅरेजजवळून पळून जातांना ताब्यात घेतले. त्याच्या कारमधून पाच किलो ४८१ ग्रॅम गांजा जप्त केला आहे. वर्तकनगर पोलीस ठाण्यात याप्रकरणी सरकारी कामात अडथळा आणणे तसेच एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला २० ऑगस्टर्पयत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.