मोबाइल दुकानात चोरी करणाऱ्या गँगला ३६ तासांत पोलिसांनी केली अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2018 09:44 PM2018-09-26T21:44:19+5:302018-09-27T00:39:07+5:30
हे सर्व आरोपी एकाच कुटुंबातील असून इराण देशाचे नागरिक आहेत. मोहम्मद जाफरी, आणि त्याच्या दोन मुली लैला जाफरी आणि झायरा जाफरी या आरोपींना नवघर पोलिसांनी आज सकाळी बेड्या ठोकल्या असून न्यायालयाने त्यांना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.
मुंबई - मुलुंडमध्ये फॉरेनर असल्याचे सांगून मोबाईलच्या दुकानातून मोबाईल चोरी करणाऱ्या टोळीला नवघर पोलिसांनी ३६ तासाच्या आत बेड्या ठोकल्या आहेत.हे सर्व आरोपी एकाच कुटुंबातील असून इराण देशाचे नागरिक आहेत. मोहम्मद जाफरी, आणि त्याच्या दोन मुली लैला जाफरी आणि झायरा जाफरी या आरोपींना नवघर पोलिसांनी आज सकाळी बेड्या ठोकल्या असून न्यायालयाने त्यांना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. २४ तारखेला मुलूंडच्या वासुदेव फडकेमार्गावरील निल टेलिकॉम मोबाईलमध्ये हे तिन्ही परदेशी नागरिक असलेले आरोपी आले होते. यातील मोहम्मद याने मालक प्रकाश यांना चलन बदलून देण्याच्या विषयावर बोलण्यात गुंतवुन ठेवले तर त्याची मोठी मुलगी लैला हिने दुकानातील कर्मचाऱ्यांना मोबाईल चा कव्हर दाखविण्याच्या बहाण्याने गुंग करून ठेवले होते. याच वेळी कोणाचे लक्ष नाही हे पाहिल्यावर झायरा हिने दुकानातील टेबल ठेवलेल्या महागड्या मोबाईल पैकी सॅमसंग कम्पनीचा २२ हजार रुपये किमतीचा मोबाईल चोरला होता. हा संपूर्ण प्रकार दुकानातील सीसीटीव्हीमध्ये कैद झाला होता. ही बातमी प्रसार माध्यमात येताच खबऱ्यांनी पोलिसांशी संपर्क करून ही टोळी माहिम येथे रहात असल्याचे सांगितले. नवघर पोलिसांनी तत्काळ या टोळीला माहिम मधून बेड्या ठोकल्या आहेत. मेडिकल व्हिजा घेऊन या मुली आणि बाप भारतात राहत आहेत. त्यांनी अजून कुठे अशा प्रकारचे गुन्हे केले आहेत का? याचा पोलीस शोध घेत आहेत.