पैशांचा पाऊस पाडणारे गुन्हे शाखेच्या जाळ्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: January 1, 2020 03:56 PM2020-01-01T15:56:38+5:302020-01-01T16:00:13+5:30
गुन्हे शाखेच्या कक्ष ९ ने ही कारवाई केली आहे.
मुंबई - तांत्रिक विद्येद्वारे पैशांचा पाऊस पाडण्याचे आमिष दाखवून व्यावसायिकांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. यात, अटक आरोपी खेळण्यातील नोटांद्वारे गुंतवणूकदारांना कोट्यवधीचा गंडा घालत असल्याचेही समोर आले. गुन्हे शाखेच्या कक्ष ९ ने ही कारवाई केली आहे.
वांद्रे येथील लालमट्टी झोपडपट्टीजवळ एका कारमध्ये बसून काही जण पैशांचा पाऊस पाडण्याची चर्चा करत असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली. त्यानुसार, गुन्हे शाखेचे वपोनि महेश देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवारी पथकाने चौकडीला ताब्यात घेतले. त्यापैकी निश्वीतकुमार रविराज शेट्टी (३६) हा गेल्या अनेक वर्षापासून अशाप्रकारे फसवणूक करत असल्याची माहिती समोर आली. त्याने, अनेकांकडून बंक खात्यावर तसेच रोखी को़ट्यवधी रुपये घेतल्याची माहिती समोर आली.
शेट्टी आणि त्याचे साथीदार लोकांना काळी जादू दाखवून आत्माला बोलावून तांत्रिक विद्येच्या जोरावर पैशांचा पाऊस पाडत असल्याचे सांगायचे. आणि गुंतवणूकदारांना त्यांच्याकडील रक्कमेच्या ५० पट रक्कम देण्याचे आमिष दाखवत असे. या आमिषाला बळी पडून अनेक व्यावसायिकांनी गुंतवणूक केलई. पुढे गुंतवणुकीची रक्कम हाती पडताच ही मंडळी नॉट रिचेबल होत असे. तेथून ठिकाणे आणि मोबाईल क्रमांक बदलून ते नव्या सावजाच्या शोधात असल्याचे पोलीस तपासात समोर आले.
त्यांच्या कारमधून पोलिसांनी ’भारतीय बच्चो का बँक’ असे लिहिलेल्या नोटाही हस्तगत केल्या आहेत. तसेच अॅम्बसी ऑफ युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका या नावाचे बनावट पत्र, काळ्या कापडाची बाहुली, ५ नारळ, रंगीत धाग्यांची गुंडी, हळद, कुंकू, लिंबू, काळे तीळ, सुया आणि काळे कापड मिळून आले. त्यानुसार, त्यांच्याविरुद्ध वांद्रे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
शेट्टी हा मिरारोडचा रहिवासी असून फायनान्सचे काम करतो. त्याच्या राहत्या घरातील खोली पैशाने भरलेली असल्याचा आभास निर्माण केला. त्यासाठी त्याने थर्माकॉलला पाचशे ते दोन हजार रुपयांच्या खोट्या नोटा चिकटवलेल्या दिसून आल्या. याद्वारेच तो व्यावसायिकांचा विश्वास संपादन करत असे. यात फसलेल्या तक्रारदार व्यावसायिकाची १ कोटी १२ लाख ४१ हजार रुपयाची फसवणूक केली. शिवाय, गुंतवणूकदारांच्या खात्यावर लवकरच पैसे जमा होतील. यासाठी रिझर्व बँक ऑफ इंडीयाचे बनावट पत्र देखील पोलिसांनी जप्त केले आहेत. देसाई यांच्या मार्गदर्शनखाली तपास पथक पोलीस निरिक्षक संजीव गावडे, आशा कोरके, सहाय्यक पोलीस निरिक्षक सुधीर जाधव, शरद धराडे, वाल्मीक कोरे, पोलीसउपनिरिक्षकविजयेंद्र आंबवडे आणि अंमलदार यांनी कारवाई केली आहे.