ट्रिपल तलाकच्या गुन्ह्यात पतीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2019 11:21 PM2019-12-07T23:21:25+5:302019-12-07T23:22:19+5:30
राज्यातील ही पहिली घटना असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
-कुमारबडदे
मुंब्रा - बेकायदेशीररित्या तीन वेळा तलाक बोलून म्हणजेच ट्रिपल तलाकप्रकरणी पोलिसांनीअटक केली. चार महिन्यांपूर्वी अस्तित्वात आलेल्या ट्रिपल तलाकविरोधी कायद्याअंतर्गत पतीला अटक करण्यात आल्याची राज्यातील ही पहिली घटना असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
मुंब्र्यातील संतोष नगर परिसरतील गंगा निवास, मदिना मंझिलमध्ये रहाणाऱ्या 35 वर्षे वयाच्या गृहिणीचा 10 वर्षापूवी याच भागातील बॉम्बे कॉलनी परिसरातील अली मजिल या इमारतीमध्ये रहात असलेल्या मोहम्मद इरफान अन्सारी याच्याशी मुस्लिम रितीरिवाजाप्रमाणे विवाह (निकाह) झाला होता. परंतु मागील सव्वातीन वर्षापासून तो तिला किरकोळ कारणांवरुन शिविगाळ करुन मारण्याची धमकी देत होता. 8 आणि 10 वर्षाच्या दोन मुलांना तिच्याजवळ सोडून कुटुंबाशिवाय राहणाऱ्या अन्सारीने 5 डिसेंबरला तिच्या आईच्या घरी जाऊन तिची आई, बहिण आणि शेजाऱ्यासमोर तीन वेळा तोंडी तलाक बोलून तिला तलाक दिला. याबाबत पिडित महिलेने दाखल केलेल्या तक्रारीवरुन अन्सारी यांच्याविरोधात भा.दं.वि. कलम 323, 504, 506 सह मुस्लिम हक्काचे संरक्षण कायदा 2019 च्या कलम 4 अन्वये गुन्हा दाखल करुन त्याला अटक करण्यात आली असल्याची माहिती मुंब्रा पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक मधुकर कड यांनी लोकमतला दिली.