सार्वजनिक शौचालयात महिलांचे मोबाईलमध्ये व्हिडीओ काढणारा पोलिसांच्या ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2020 12:11 AM2020-06-05T00:11:58+5:302020-06-05T00:15:58+5:30
तरुणीच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करत सिंगवर कारवाई केली आहे.
मुंबई : रहिवाशी चाळीतील सार्वजनिक शौचालयात मोबाईलद्वारे महिलांचे व्हिडीओ काढणाऱ्या विकृता विरुद्ध बुधवारी आग्रीपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका तरुणीचे लक्ष मोबाईलकड़े जाताच हा धक्कादायक प्रकार समोर आला. प्रशांत सिंग असे विकृत तरुणाचे नाव असून, आग्रीपाडा पोलीस अधिक तपास करत आहेत.
येथील एमजी रोडवरील बीआय टी चाळ क्रमांक २ मध्ये हा प्रकार घडला. बुधवारी २७ वर्षीय महिला नैसर्गिक विधीसाठी गेली, असता तिला कोणीतरी सिगारेट ओढत असल्याचे लक्षात आले. तिने भिंतीकड़े पाहताच तिला मोबाईल दिसून आला. तिने मोबाईल घेताच सिंगने तो त्याच्याकडे ओढ़ण्याचा प्रयत्न केला. तिने मोबाईल घेत, बाहेर येताच सिंगने मोबाईल परत देण्यास सांगितला. तरुणीने भावाला बोलावून याबाबत सांगताच, त्याने मोबाइलची पाहणी केली तेव्हा, तरुणीचा व्हिडीओ मिळून आला. त्यानुसार स्थानिकांच्या मदतीने सिंगला आग्रीपाडा पोलिसांच्या ताब्यात दिले.
तरुणीच्या तक्रारी वरून पोलिसांनी गुन्हा दाखल करत सिंगवर कारवाई केली आहे. तसेच तपासणी साठी त्याच मोबाईलही जप्त करण्यात आला आहे. सिंग याच इमारतीत राहण्यास आहे.