सराईत चोरटा गजाआड; बाजारपेठ पोलिसांची कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2019 06:54 PM2019-06-29T18:54:31+5:302019-06-29T18:56:11+5:30
चोरट्याकडून एक लाख ९१ हजार ४९९ रुपयांचा मुद्देमाल जप्त
कल्याण - ६४ वर्षीय वयोवृद्ध महिलेकडील बॅग हिसकावून पळ काढलेल्या फैजान शेख (२७, रा. गोविंदवाडी) या चोरट्याला बाजारपेठ पोलिसांनी मोठ्या शिताफीने २४ तासात गजाआड केले आहे. या चोरट्याकडून एक लाख ९१ हजार ४९९ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी, सहाय्यक पोलीस आयुक्त अनिल पोवार आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक यशवंत चव्हाण उपस्थित होते.
पश्चिमेतील टिळक चौकातून सकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास चालत जाणाऱ्या ट्युशन टीचर रोहिणी देवडीकर (६४) यांची रोख रक्कम व मोबाईल असलेली बॅग हिसकावून एका दुचाकीस्वाराने लांबवली होती. याप्रकरणी बाजारपेठ पोलीस स्थानकात अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करत त्याचा शोध सुरू करण्यात आला होता. कल्याणचे सहायक पोलीस आयुक्त अनिल पोवार यांनी दिलेल्या सूचनेनुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक यशवंत चव्हाण, यांच्यासह सहायक पोलीस निरीक्षक सानप व सहकाऱ्यांनी घटनास्थळासह आसपासच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. त्यामध्ये एक तरुण ही बॅग घेऊन जात असताना आढळला. मात्र, फुटेज अंधुक असल्याने पोलिसानी आपले कसब पणाला लावत हालचालींची लकब व शरीर यष्टी वरून संशयित आरोपीचा शोध घेत खबऱ्याने दिलेल्या माहितीच्या आधारे गोविंदवाडी येथे राहणाऱ्या फैजाण शेख याला अटक केली. पोलीस तपासादरम्यान फैजाण कडून आठ गुन्हे उघडकीस आले असून मोबाईल, रोकड, मंगळसूत्र असा १ लाख ९१ हजार ४९९ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.