भाजपा नेत्यांसोबत फोटो, बिल्डरला मागितली २ कोटींची खंडणी; पोलिसांनी केले जेरबंद
By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2022 09:25 PM2022-06-06T21:25:46+5:302022-06-06T21:25:53+5:30
ठाणे खंडणी विरोधी पथकाची कारवाई: दोन कोटींची केली होती मागणी
ठाणे: डोंबिवलीतील एका मोठया बांधकाम व्यावसायिकाकडे दोन कोटींच्या खंडणीची मागणी करुन १३ लाखांची रक्कम स्वीकारणाऱ्या राजेश नाना भोईर उर्फ राजु भोईर उर्फ लकी (४७) आणि सुरज पवार (३८) या दोघांना ठाणे खंडणी विरोधी पथकाने नुकतीच अटक केली आहे. या दोघांनाही ८ जूनपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक मालोजी शिंदे यांनी सोमवारी दिली.
हिरजी पटेल हे स्वामी नारायण लाईफ स्पेस एलएलपी नामक कंपनीचे संचालक आहेत. ही कंपनी डोंबिवलीतील मोठागाव-रेतीबंदर भागात नवीन गृहसंकुल उभारणीचे काम करते. या कंपनीचे रेतीबंदर खाडीच्या किनारी कार्यालय आहे. पटेल यांनी मोठागाव येथील ५८ गुंठे जमिनीवर चार इमारतींचे बांधकाम पूर्ण केले असून उर्वरित इमारतींचे बांधकाम सुरू आहे. त्यामुळेच बिल्डरकडून मोठया प्रमाणात पैसे उकळण्याचा कट आखून खंडणी मागणाऱ्या राजेश भोईर याने लोकायुक्त, विभागीय आयुक्त, कोकण भवन, सक्तवसुली संचालनालयाचे संचालक आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, यांच्यासह ठाणे जिल्हािधकारी यांच्याकडेही अर्ज केला.
याच अजार्सह भोईर याने बिल्डर पटेल यांच्याशी संपर्क साधला. ही तक्रार मागे घेण्यासाठी दोन कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी त्याने केली. पटेल यांनी ठाण्याच्या खंडणी विरोधी पथकाकडे याबाबत तक्रार केली. त्यानंतर त्यांनी राजेशला दोन कोटीपैकी २३ लाख रुपये देतो, पण तक्रार मागे घेण्याचे सांगितले. यातील ूदोन लाखांची रक्कम राजेशने सूरज पवार याच्यामार्फतीने स्वीकारली. त्यानंतर उर्वरित २१ लाखांसाठी राजेशने पटेल यांच्यामागे पुन्हा तगादा लावला. बिल्डर पटेल यांनी त्यांना मोठागाव येथील स्वामी नारायण कंपनीच्या कार्यालयात ११ लाखांचा हप्ता देण्यासाठी बोलविले. तेंव्हा वरिष्ठ निरीक्षक मालोजी शिंदे, पोलीस निरीक्षक संजय शिंदे, उपनिरीक्षक महेश कवळे, विजय राठोड आणि योगीराज कानडे, आदींच्या पथकाने सापळा लावून ११ लाखांची लाखांच्या खंडणीची रक्कम बिल्डरकडून स्वीकारतांना राजेश भोईर आणि सूरज पवार या दोघांना ४ जून २०२२ रोजी रात्री १०.४० वाजण्याच्या सुमारास अटक केली. विष्णूनगर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे खंडणी मागणाऱ्यांचे भाजपाचे नेते माजी मंत्री प्रकाश मेहता, माजी खासदार किरिट सोमय्यांसोबत छायाचित्रे तपास पथकाला आढळल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.