सराईत चोरट्याला पोलिसांनी पकडलं; आरोपीवर विविध ठिकाणी १३ गुन्हे दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2021 08:45 PM2021-08-14T20:45:34+5:302021-08-14T20:46:00+5:30
नवघर मार्गावर राहणारे ओम पोतदार यांच्या घरातील सर्वजण कामा निमित्त बाहेर गेले असता एका अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश करून लोखंडी कपाटातील लॉकरमधील सोने-चांदीचे दागिने, रोख रक्कम व ३ मोबाईल, असा एकूण २ लाख ५६ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला होता.
मीरारोड - भाईंदर पूर्वेस नवघर पोलीस ठाणे हद्दीत एका चोरट्याने घरातून दागिने, रोख, मोबाईल असा २ लाख ५६ हजारांचा ऐवज चोरून नेला. या सराईत चोरट्यास पोलिसांनी अटक केली आहे.
नवघर मार्गावर राहणारे ओम पोतदार यांच्या घरातील सर्वजण कामा निमित्त बाहेर गेले असता एका अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश करून लोखंडी कपाटातील लॉकरमधील सोने-चांदीचे दागिने, रोख रक्कम व ३ मोबाईल, असा एकूण २ लाख ५६ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला होता. पोतदार यांच्या तक्रारीवरून नवघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
गुन्हे प्रकटीकरण पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी घटनास्थळी व परिसरातील सीसीटीव्ही तपासले असता त्यात एक संशयित व्यक्ती इमारतीत जाताना व बाहेर पडताना दिसून आला होता. त्यानुसार संशयित व्यक्तीचा शोध घेतला असता तो नालासोपारा येथे राहत असल्याचे समजले.
नवघर पोलिसांनी ४८ तासाच्या आत सीसीटीव्हीच्या आधारे त्याचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने गुन्हा केल्याचे कबूल केले व आरोपीकडून चोरलेला ऐवज हस्तगत करण्यात आला. आरोपीवर विविध ठिकाणी १३ गुन्हे दाखल असल्याचे सांगण्यात आले.