आरोग्य खात्याचा बनावट ना हरकत दाखला तयार करणारे त्रिकुट गोव्यात गजाआड
By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2019 09:52 PM2019-09-01T21:52:56+5:302019-09-01T21:54:31+5:30
मडगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक तुषार लोटलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक आशिष परब पुढील तपास करीत आहे.
मडगाव - आरोग्य खात्याचा बनावट ना हरकत दाखला तयार करुन हॉटेल व्यवसाय सुरु करण्याचा डाव गोव्यात एका व्यवसायिकाच्या अंगलट आला. फसवणूक प्रकरणात गोव्यातील मडगाव पोलिसांनी त्रिकुटाला गजाआड केले. हॉटेलमालक विमलकुमार याच्यासह पोलिसांनी रुतम्मा सोमी अदाम व रोशन बोरकर या तिघांच्या मुसक्या आवळल्या. भारतीय दंड संहितेच्या 420, 465,468 व 471 कलमाखाली पोलिसांनी या संशयितांवर गुन्हा नोंद केला आहे. मडगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक तुषार लोटलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक आशिष परब पुढील तपास करीत आहे.
मडगाव येथील सरकारी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आरोग्यअधिकारी डॉ. अंजू खरंगटे या तक्रारदार आहेत. विमलकुमार याने मडगावातील कालकोंडा या भागात हॉटेल सुरु करण्यासाठी रुतम्मा सोमी अदाम व रोशन बोरकर या दोघांना हाताशी धरुन हा ना हरकत दाखला मिळविला होता. हा दाखला खरा असल्याचे भासवून त्याने तो आपल्या दुकानात लावला होता. या प्रकरणाची माहिती आरोग्य खात्याला मिळाल्यानतंर आरोग्याधिकारी डॉ. अंजू खरगंटे यांनी या हॉटेलात जाउन पहाणी केली असता, हा दाखला बनावट असल्याचे आढळून आल्यानंतर या संबधी पोलिसांत तक्रार नोंदविली.